आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Commissioner Gudewar Will Implement Swachata Abhiyan

आयुक्तांचे ‘स्वच्छता’ मिशन!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार आता ‘स्वच्छता’ मिशन राबविणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहे. साफसफाई कंत्राटदारांना थकित असलेल्या १० पैकी तीन महिन्यांचे देयके देण्यास आयुक्तांकडून हिरवी झेंडी मिळाली. असे असले तरी अन्य सात महिन्यांचे देयके संपूर्ण तपासणी शिवाय मिळणार नसल्याचेदेखील आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.थकीत बिलासाठी महापालिकेत सफाई ठेकेदारांकडून करण्यात आलेले स्वयंस्फूर्त आंदोलन आज (१० जून) चांगलेच गाजले.

शहरातील दैनंदिन साफसफाईचे मागील १० महिन्यांचे देयके थकीत असल्याने ठेकेदारांनी एकत्र येत दुपारी १२ वाजता स्वयंस्फूर्त आंदोलन आरंभ केले. काही ठेकेदारांनी देयकाबाबत भेट घेतल्यानंतर आयुक्तांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यादरम्यान सर्वच प्रभागांतील ठेकेदार महापालिकेत एकत्र आले होते. आरोग्य अधिकारी डॉ. श्यामसुंदर सोनी यांच्याकडे त्यांनी मोर्चा वळविला.

आरोग्य अधिकारीदेखील ठेकेदारांची समजूत काढण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी पुन्हा आयुक्त कार्यालयाकडे मोर्चा वळवला. मात्र आयुक्तांनी ठेकेदारांना भेट नाकारत आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत दुपारी वाजता बैठक घेणार असल्याचे सांगितले. यादरम्यान सफाई ठेकेदारांनी महापालिका परिसरात प्रचंड नारेबाजी करीत चांगलाच गदारोळ घातला. पोलिसांकडून देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सायंकाळी वाजता झालेल्या बैठकीत तीन महिन्यांची देयके देण्यास आयुक्तांनी होकार दिला. मात्र अन्य सात महिन्यांची बिले संपूर्ण तपासणी शिवाय मिळणार नसल्याचेदेखील स्पष्ट केले. या वेळी साफसफाई ठेकेदारासह काही लोकप्रतिनिधींची देखील उपस्थिती होती.
यापूर्वी झाला होता गदारोळ
शहरातील साफसफाईच्या मुद्यावरून मागील वर्षी आमसभेत चांगलाच गदारोळ झाला होता. दैनंदिन साफसफाई करणारे कर्मचारी हजेरी बुकवर जास्त अन् कर्तव्यावर कमी, असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे होते. अनेक आमसभा यामुळेच गाजल्या. शहरातील साफसफाई व्यवस्थित होणे तसेच कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरली नसल्याने तत्कालीन आयुक्त अरुण डोंगरे यांनी देयके थकवली होती.
धोरण बारगळले
शहरातील साफसफाई बाबत महापालिकेकडून नव्याने धोरण निश्चित करण्यात आले. मात्र नवीन धोरणावर अद्याप अंमल झालेला दिसून येत नाही. जुन्याच पद्धतीनुसार साफसफाईची कामे होत असून शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न अद्याप कायम आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून साफसफाई होणे गरजेचे आहे, मात्र त्यात दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक आढळून येत असल्याने हे स्पष्ट होत आहे.