आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापौर निवडणुकीत काँग्रेसच ‘किंगमेकर’, निवडणुकीमुळे तापले वातावरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापौर निवडणुकीत काँग्रेसच किंगमेकरच्या भूमिकेत राहणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. आघाडी धर्मानुसार अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करावी, की खोडके गटाच्या राकाँ फ्रंटला मदत करावी, हा यक्षप्रश्न काँग्रेससमोर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत फुटीचा लाभ घेत काँग्रेसदेखील महापौर पदावर दावा करण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत महापौर पदासाठी महापालिकेत वर्चस्वाची लढाई होणार आहे. आघाडीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडे आगामी अडीच वर्षे महापौरपद तर काँग्रेसकडे उपमहापौरपद राहणे अपेक्षित आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत खोडके गट राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर गेला आहे. असे असले तरी एनसीपी फ्रंटच्या रूपाने खोडके गटाकडे पालिकेत मोठी ताकद कायम आहे. आगामी महापौर आमचाच असेल, असा दावा खोडके गटाकडून केला जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खोडके गटाचे अविनाश मार्डीकर यांना एनसीपी फ्रंटचे गटनेते कायम ठेवले आहे. त्यामुळे खोडके गटाचे वजन आणखी वाढले आहे. या स्थितीमध्ये आमदार रावसाहेब शेखावत कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. युवा स्वाभिमान राष्ट्रवादीचे मिळून त्यांची संख्या जेमतेम सात किंवा आठच्या वर जाणार नाही. खोडके गटाकडे महापौर पदावर दावा करण्याइतके संख्याबळ असले, तरी आघाडी धर्मानुसार काँग्रेसची साथ मिळेल की नाही, याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. आमदार रवि राणा यांची पत्नी नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिल्याने संजय खोडके यांचा राष्ट्रवादीसोबत काडीमोड झाला आहे. राष्ट्रवादीत नसल्याने काँग्रेसदेखील आघाडी धर्मानुसार खोडके गटाला समर्थन करतील, अशी शक्यता कमीच आहे.
अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेसला डावलत काँग्रेसने खोडके गटासोबत सलगी केली, तर राज्यात त्याचा वेगळा संदेश जाण्याची शक्यता आहे. बदलते राजकीय समीकरण लक्षात घेता काँग्रेसदेखील महापौर पदाची आयती चालून आलेल्या संधीवर पाणी फेरू देणार नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एनसीपी फ्रंटमधील अंतर्गत भांडण अधिक तीव्र झाल्यास त्याचा लाभ घेण्याची संधीदेखील काँग्रेसला चालून आली आहे. या स्थितीमध्ये काँग्रेसच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
...तर शिवसेनेचा महापौर
संजयखोडके नवीन राजकीय संधीच्या शोधात आहेत. त्यांची शिवसेनेसोबत जवळीक वाढल्याची आणि बडनेरा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. असे झाल्यास विधानसभेवर डोळा ठेवत महापालिकेत महापौर पदासाठी शिवसेनेला मदतदेखील केली जाऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे.