आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Sector 194 Toilets Issue At Amaravati

स्वच्छतागृहांच्या उघड्या झाकणांमुळे जीव टांगणीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिका क्षेत्रातील पाच झोनमध्ये 194 सार्वजनिक स्वच्छतागृहे असून, बहुतांश ठिकाणी त्यावर ढापे नसल्याने खेळता-खेळता त्यामध्ये मुले पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रविवारी 13 वर्षीय बालिका त्यामध्ये पडली. मागील वर्षी महापौरांच्या वॉर्डातीलच टाक्यात पडून एका बालकाचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर सोमवारी ‘दिव्य मराठी’ने निवडक दहा सार्वजनिक स्वच्छतागृहांची पाहणी केली. त्यापैकी पाच स्वच्छतागृहांची स्थिती अत्यंत वाईट असल्याचे आढळून आले.
शहरातील आर्थिक दुर्बल भागामध्ये सर्वाधिक सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. त्यांतील अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांना दरवाजे नाहीत. पाण्याची टाकी असली तरी त्यात पाणी कधीच राहत नाही. मैला काढण्यासाठी टाकीची झाकणे उघडली जातात, ती परत झाकली जात नाहीत. झाकणे उघडी राहत असल्याने शहरात वारंवार अपघात घडत आहेत. यानंतरही स्वच्छतागृहाच्या टाकीची झाकणे दुरुस्त होत नसल्याने ते नागरिकांच्या जिवावर बेतत आहेत. आर्थिक दुर्बल भागांमध्ये महापालिकेच्या शाळा आणि स्वच्छतागृहे थोड्याच अंतरावर आहेत. एक्स्प्रेस हायवेजवळील वडरपुरा आणि बेलपुरा येथे भेट दिल्यास हे स्पष्ट होईल.
लवरकच निविदा प्रक्रिया :
सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती लवकरच केली जाणार आहे. दुरुस्तीबाबत निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती आहे. महापालिकेच्या मागासवर्ग कक्षाचे अभियंता निविदा प्रक्रिया राबवण्याची तयारी करीत आहेत. ही दुरुस्तीची कामे केव्हा केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशी आहे स्थिती
रतनगंज, विलासनगर, लक्ष्मीनगर, बेलपुरा, लालखडी, नवसारी, फ्रेजरपुरा, वडाळी आदी भागांमध्ये असलेले 50 टक्के सार्वजनिक स्वच्छतागृहे सुस्थितीत असले तरी तेवढय़ाच धोकादायक स्थितीत आहेत. विलासनगरातील विकास विद्यालयासमोर अगदी मुख्य रस्त्यालगत असलेल्या स्वच्छतागृहाच्या टाकीचे झाकण उघडे आहे. नवसारी आणि रतनगंज येथील स्वच्छतागृहांच्या टाकीचे झाकण उघडे असल्याचे आढळून आले.
खुले टाके, नाल्याचा धोका
वडरपुरा येथील पालिका शाळा क्रमांक 21 जवळील परिस्थिती धोकादायक आहे. येथे स्वच्छतागृहाचे खुले टाके आणि नाल्याच्या पुराचा धोका आहे. शाळा नाल्याच्या काठावर आहे. शाळेला सुरक्षा भिंतही नाही.
शहरात 194 स्वच्छतागृहे
पाचही झोन मिळून एकूण 194 सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. या स्वच्छतागृहांच्या देखरेखीची जबाबदारी पालिकेच्या मागासवर्ग विकास विभागाची आहे. स्वच्छतागृह दुरुस्ती-देखभाल करण्यासाठी कर्मचारी असतानाही 50 टक्के स्वच्छतागृहांची स्थिती वाईट आहे.
कारवाई करणार
सार्वजनिक स्वच्छतागृहातील खुल्या झाकणांचा प्रश्‍न गंभीर आहे. सार्वजनिक आरोग्यासोबत टाक्यांवरील खुल्या झाकणांमुळे दुर्घटना होऊ नये, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षक व सफाई कामगारांची आहे. दुर्लक्ष करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल. शेख हमीद शद्दा, सभापती, शहर सुधार समिती.