आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Security Issue At Amravati, Divya Marathi

मनपाची सुरक्षा वार्‍यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महापालिकेतील मुख्य इमारतीत असलेल्या 500 कर्मचार्‍यांची सुरक्षा व्यवस्था सध्या वार्‍यावर आहे. मंगळवारी (दि. 6) दोन मद्यपींनी पालिका परिसरात धुमाकूळ घातल्यानंतर येथील सुरक्षा व्यवस्था सजग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्य प्रवेशद्वारच नव्हे, अन्य दोन मार्गांकडून कुणीही यावे, त्यांना महापालिकेच्या इमारतीत विनासायास प्रवेश मिळतो. कागदोपत्री सव्वाशे सुरक्षा रक्षक असताना महापालिकेचे हे हाल आहेत. प्रशासनाने याविषयी गांभीर्याने विचार करण्याची गरज या घटनेनंतर व्यक्त केली जात आहे.
महापालिकेमध्ये प्रशासकीय कामकाजावरून येथील दोन मद्यपींनी धुमाकूळ घातला. महिला कर्मचार्‍यांसमोरच या दोघा तळीरामांनी अधिकारी, कर्मचार्‍यांना अर्वाच्य शिव्या दिल्या. पोलिस येईपर्यंत त्यांना कुणीही अडवले नाही वा जाबही विचारला नाही. महापालिकेकडे स्वत:ची मोठी सुरक्षा यंत्रणा असताना उपायुक्तांच्या कक्षात घुसून धुमाकूळ घालण्याचा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे महापालिका इमारतीच्या सुरक्षिततेचाच प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर पालिकेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली जात आहे. पालिकेचे सुरक्षा रक्षक नेमके करतात काय, असा प्रश्नही यामुळे उपस्थित झालाय.

यापूर्वी महानगरपालिकेत रमाई घरकुल योजनेशी संबंधित अभियंता दिनेश हंबर्डे यांना मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. काही महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा असाच घटनाक्रम घडणे ही चिंतेची बाब आहे, असे कर्मचार्‍यांचे मत आहे. दोषींवर त्वरित कडक कारवाई करण्याची मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे.

पाच झोनमध्ये आहेत 127 सुरक्षा रक्षक
महापालिकेत खासगी एजंसीमार्फत 127 सुरक्षा रक्षक कार्यरत असल्याची माहिती आहे. त्यांना किमान वेतन कायद्यानुसार दरमहा वेतन दिले जाते. मद्यपींचा धुमाकूळ, अभियंत्याला मारहाण या घटना सव्वाशे सुरक्षा रक्षकांच्या कार्यप्रणालीवर प्रo्नचिन्ह उपस्थित करणार्‍या आहेत. घटनेची जबाबदारी टाकत सुरक्षा रक्षकांचे कंत्राट असलेल्या एजंसीवर कारवाई होणे गरजेचे आहे.
महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. मंगळवारी दोन मद्यपींनी उपायुक्त रमेश मवासी यांच्या कार्यालयात गोंधळ घातल्यानंतर पालिकेतील सुरक्षा यंत्रणेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालिकेत स्वत:चे शंभरावर सुरक्षा रक्षक असतानाही दोन मद्यपींनी अशा प्रकारे गोंधळ घातल्याने पालिकेच्या सुरक्षा यंत्रणेचे धिंडवडे निघाल्याचे स्पष्ट झाले आहे.