अमरावती- महापालिकेत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमुळे चंद्रपूरचे नगरसेवक प्रभावित झाले. नावीन्यपूर्ण ऑटो डीसीआर, ऑनलाइन मालमत्ता कर भरणा प्रणालीची त्यांनी प्रशासनाकडून नुकतीच माहिती घेतली. महापौर वंदना कंगाले यांनी चंद्रपूर महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती सदस्यांचे स्वागत केले.
चंद्रपूर महापालिकेतील महिला व बाल कल्याण सभापती उषा धांडे, उपसभापती संगीता पेरुकले, सदस्य जयर्शी जुमडे, रमावती अहीर, महानंदा वाळके, सुभेदिया कश्यप, ललिता गराड, लता साव, सुषमा नागोसे, सकिना अन्सारी, योगिता मडावी, अधिकारी शरद नागोसे, अहमद सिद्दीकी यांचा पथकामध्ये समावेश आहे. महापौर कंगाले यांनी महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. महिला व बाल कल्याण अधिकारी नरेंद्र वानखडे यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. अपंगांना साहित्य वाटप, संगणक प्रशिक्षण, महिलांना शिलाई वाटप, खेळणी वाटप, स्पर्धा परीक्षा वाचनालय, अंगणवाडीमध्ये देण्यात आलेले वजनकाटे आदी उपक्रमांची माहिती या वेळी देण्यात आली.