आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporator Fahamida Husband Arrest In Amravati

नगरसेविका फहमिदा यांच्या पतीला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - घराशेजारी राहणार्‍या अ. सलीम अ. अजीजवर प्राणघातक हल्ला करून नगरसेविका फहमिदा नसरीन यांचे पती हबीब शाह ऊर्फ हब्बू याने पळ काढला होता. हब्बूला रविवारी सायंकाळी बडनेरा परिसरातून अटक करण्यात आल्याचे नागपुरी गेट पोलिसांनी सांगितले.

हब्बू आणि अ. सलीम यांच्यात मागील अनेक वर्षांपासून वाद आहे. हा वाद आठ सप्टेंबरपासून नव्याने उफाळून आला. दुपारी एकच्या सुमारास दोन्ही गट एकमेकांसमोर आले. हब्बू व त्याच्या चार सहकार्‍यांनी अ. सलीमवर प्राणघातक हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. या वादात हब्बूवरसुद्धा अ. सलीमच्या सहकार्‍याने चाकूने वार केले होते. पोलिसांनी हब्बू, नगरसेविका फहमिदा नसरीन यांच्यासह पाच जणांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हे दाखल होते. प्रकृती चिंताजनक असल्याने अ. सलीमला खासगी रुग्णालयात हलवले, तर हब्बूवर इर्विनमध्येच उपचार सुरू होते. त्याने 13 सप्टेंबरला इर्विनमधून पळ काढला. तेव्हापासून नागपुरी गेट पोलिस त्याच्या मागावर होते.

रविवारी सायंकाळी तो बडनेरा परिसरात असल्याची माहिती मिळताच त्याला पोलिसांनी तेथून ताब्यात घेतले. नागपुरी गेटचे ठाणेदार कुमार आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक फिरोजखान पठाण यांच्या नेतृत्वात रवींद्र काळे, नाना चिंचमलातपुरे, विजय पेठे, इस्राईल शाह, ओमप्रकाश देशमुख यांनी ही कारवाई केली. याच वादातून 15 सप्टेंबरला नगरसेविका तसेच मिनी महापौर फहमिदा यांच्यावर भरचौकात चाकुहल्ला केला होता. या हल्ल्यात फहमिदा गंभीर जखमी झाल्या. त्या प्रकरणात दहा जणांची नावे त्यांनी सांगितली होती. आतापर्यंत पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.