आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Standing Committee Chairman,latest News In Divya Marathi

तिजोरीची चावी मिलिंद बांबल यांच्या हाती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महानगरपालिकेच्या तिजोरीची चावी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद बांबल यांच्याकडे आली आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी त्यांची गुरुवारी अविरोध निवड झाली. मनपा सभागृहात जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी गुरुवारी सकाळी सव्वाअकरा वाजता ही घोषणा केली. यानंतर मनपा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
जिल्हाधिकारी महिवाल यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता सभापतीच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला. त्यापूर्वी सकाळी आठ ते दहा या वेळेत नामांकन दाखल करण्यात आले. सभापतिपदासाठी मिलिंद बांबल यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची अविरोध निवड झाल्याची घोषणा महिवाल यांनी अवघ्या 15 मिनिटांत केली.
16 सदस्यीय स्थायी समितीचे 15 सदस्य या वेळी उपस्थित होते. बसपच्या कोट्यातील एक पद रिक्त आहे. निवडीची घोषणा होताच मनपा परिसरात फटाके फोडून व ढोलताशे वाजवून जल्लोष करण्यात आला. त्यानंतर रेल्वे स्थानक चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातदेखील जल्लोष झाला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अविनाश मार्डीकर, पक्षनेते बबलू शेखावत, माजी सभापती चेतन पवार, सुगनचंद गुप्ता, माजी महापौर विलास इंगोले, रिना नंदा यांच्यासह अन्य उपस्थित होते.
स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीचे चार सदस्य असून, त्यामध्ये मिलिंद बांबल, जयर्शी मोरे, वंदना हरणे आणि सारिका महल्ले यांचा समावेश आहे. समितीमध्ये निवड झाल्यापासून मिलिंद बांबल यांच्याकडे सर्वांचा रोख होता. वरिष्ठ सदस्य असल्याने जयर्शी मोरे यादेखील स्पध्रेत होत्या. निवडणुकांचे वर्ष असल्याने सभापतिपद कोणाला मिळणार, याबाबत सर्वत्र बराच खल झाला होता. अखेर मिलिंद बांबल यांनी निवडणुकीत बाजी मारली.