अमरावती- भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती पुलाच्या संरक्षक भिंतीवर जाऊन आदळली. यात सुदैवाने प्राण हानी झाली नाही. मात्र, कार चक्काचूर झाली ही घटना राजापेठ भागातील भारतीय महाविद्यालयासमोर शनिवारी मध्यरात्री घडली.कारची परिस्थिती पाहल्यानंतर यामधील कोणालाही दुखापत झाली नाही, यावर विश्वास बसत नव्हता.
मूर्तिजापूर येथे राहणारे दोन युवक शनिवारी अमरावतीत आले होते. रात्री काम आटोपल्यानंतर ते कारने (एचएच 10 9483) मूर्तिजापूरला परत निघाले होते. गद्रे चौकापासून शंभर मीटर पुढे असलेल्या भारतीय महाविद्यालयासमोर चालकाचे कारवरून नियंत्रण सुटले. कारची गती अधिक असल्यामुळे या ठिकाणी असलेल्या पुलाच्या संरक्षक भिंतीवर कार जाऊन आदळली. या धडकेत संरक्षक भिंत तुटली तसेच कार उलटली. यामध्ये कारचे चारपैकी तीन टायर फुटले, तर दर्शनी भागासह संपूर्ण कारच चक्काचूर झाली होती. अपघाताची माहिती मिळताच राजापेठ ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन पुंडगे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. कारच्या काच फोडून दोन्ही युवकांना बाहेर काढण्यात आले. त्यांना किरकोळ दुखापत झाली होती म्हणून इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारानंतर त्यांना रविवारी सकाळी सुटी देण्यात आली. शनिवारी मध्यरात्री घडलेल्या अपघातात भरधाव कारचा असा चक्काचूर झाला.