अमरावती- शिक्षण, कला, संस्कृती, राजकारण, समाजकारण आणि पुरोगामी विचारांचा समृद्ध वारसा लाभलेल्या अमरावतीत संगीत क्षेत्रात नवप्रतिभा झपाट्यानं उदयास येत आहे. येथील पिढीच्या नसानसांमध्ये संगीत उपजतच भिनले आहे. मात्र, ‘लाइव्ह परफॉर्मन्स’ कमी होत असल्यानं सादरीकरणास र्मयादा येत असल्याची खंत शहरातील तरुणांनी व्यक्त केली. दूरचित्रवाहिन्यांवरून गायन, नृत्य, संगीत क्षेत्रातील प्रतिभेस विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झाल्याने करिअर म्हणून हे क्षेत्र झपाट्याने पुढे आले. त्यामुळे या क्षेत्राकडे तरुणाईचा कल वाढला आहे. मात्र, कौशल्यास व्यासपीठ मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्याकरिता पुढाकाराची गरज असल्याचे तरुणांनी व्यक्त केले आहे.
सुगमकडून शास्त्रीय संगीताकडे
शास्त्रीय संगीत, हिंदी-मराठी सुगम संगीत, वेस्टर्न संगीतात अंबानगरीतून कलावंत घडताहेत. मात्र, संगीताला शास्त्रीयतेची जोड असल्यास काळाच्या कसोटीवर तो कलाकार मागे पडत नाही. मुलांमध्ये संगीताची गोडी निर्माण करण्यासाठी एकदम शास्त्रीय संगीतात न टाकता सुगमकडून शास्त्रीयकडे जाणारा मार्ग दाखवावा लागेल, असे संगीत क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.