आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीकरांचा ‘नमो’त्सव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंधरावे पंतप्रधान म्हणून शपथ घेताच शहरभरात फटाक्यांच्या आतषबाजीत विजयोत्सव साजरा करण्यात आला. जागोजागी मिठाई वाटप करीत अमरावतीकरांनी जणू ‘नमो’त्सवच साजरा केला. राजापेठ येथील भाजप कार्यालयापुढे कार्यकर्त्यांनी डीजेवर नृत्य केले.

माजी महापौर किरण महल्ले, निवेदिता चौधरी, राधा कुरील, सुरेखा लुंगारे, राजलक्ष्मी केशरवाणी यांनी फुगडीचा ताल धरला. तुषार भारतीय, रवींद्र खांडेकर, विनय नगरकर, संजय अग्रवाल, दिनकर चौधरी, सुनील पाठक, प्रसाद खरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या वेळी हजर होते.

‘पोलिसांशी कार्यकर्त्यांचा वाद जल्लोष लक्षात घेता राजापेठ येथील भाजपा कार्यालयापुढून राजकमल चौकाकडे जाणार्‍या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. कार्यकर्ते नाचत असतानाच राजापेठचे पोलिस निरीक्षक अशोक धोत्रे यांनी मार्ग खुला केला. यामुळे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर हा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

खोलापुरी गेट ते जवाहर गेट अशी फटाक्यांची लड : खोलापुरी गेट ते सराफा आणि पुढे जवाहर गेट अशी फटाक्यांची लड भाजपचे जगदीश गुप्ता, रमेश शर्मा, राजा खारकर यांच्या नेतृत्वात लावण्यात आली होती. शहराच्या सातखिराडी, भाजीबाजार, बुधवारा या भागांसह अनेक ठिकाणी घराघरांत दिवे लावून आनंद व्यक्त करण्यात आला. विविध भागांमध्ये उत्साह दिसून आला.