आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींच्‍या शपथविधी वेळी शहरात जल्लोष, दीड कोटींचे फटाके; पाच टन मिठाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 26) देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. या औचित्यावर कोट्यवधीचे फटाके आणि पाच टन मिठाईचे वाटप करून अमरावतीकरांनी मोठय़ा दिमाखात जल्लोष साजरा केला. व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीवरून फटाके आणि मिठाईची उलाढाल एरवीपेक्षा दणक्यात झाली. शहरातील छोट्या-मोठय़ा मिठाई तसेच फटाका प्रतिष्ठानवर नागरिकांची गर्दी लक्षणीय होती, असेही त्यांनी नमूद केले.

भारतीय जनता पक्षाचे खासदार नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि लाडूचे वाटप करून मोठय़ा प्रमाणावर जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान, शहरातील चौकाचौकांतून होणारी फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजाळून निघाला. जणू काही दिवाळीच असल्याचा भास शहरात बघायला मिळाला. दुसरीकडे मिठाई वाटून तोंड गोड करण्यात येत होते. तब्बल दीड कोटींचे फटाके आणि वीस लाख रुपयांच्या मिठाईचा व्यवसाय झाल्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हादेखील फटाक्यांची लड फोडून जल्लोष साजरा करण्यात आला होता. तथापि, सोमवारी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार होते. त्यामुळे स्वाभाविकच फटाके आणि मिठाईच्या विक्रीत वाढ होणार, असा अंदाज व्यावसायिकांनी बांधला होता. तसेच चित्रदेखील शहरात बघायला मिळाले. फटाके आणि मिठाईचे प्रतिष्ठान नागरिकांनी फुलून गेले होते. एकमेकांना पेढे भरवून अमरावतीकरांनी ‘नमो’त्सव साजरा केला.

उत्पन्नामध्ये दहा टक्क्यांची वाढ
आनंदोत्सवासाठी बहुतांश लोकांनी स्वत:च आचारी सांगून लाडू तयार करून घेतले. त्यामुळे मिठाई व्यावसायिकांना पाहिजे तसे उत्पन्न प्राप्त झाले नाही. तरीदेखील जल्लोषाचे वातावरण असल्याने उत्पन्नात दहा टक्क्यांची वाढ झाली. चंद्रकांत पोपट, मिठाई व्यावसायिक.

दिवाळीची आठवण
दीपावलीच्या शुभमुहूर्तावर ज्याप्रमाणे फटाक्यांची आतषबाजी होते, तसाच काहीसा अनुभव सोमवारी शहरात बघायला मिळाला. फटाक्यांची लड आणि आसमंतात फुटणार्‍या फॅन्सी फटाक्यांची धूम होती. कार्यकर्त्यांसह नागरिकांनी एकाच दिवशी कोट्यवधीच्या घरात अमरावतीकरांनी फटाके फोडले. ही एकप्रकारे दिवाळीच होती. विशाल कुळकर्णी, फटाका विक्रेता.