आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Farmers Suicide, Agriculture

शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्तीच, नरेंद्र मोदींचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - सीमेवर लढताना जेवढे सैनिक शहीद झाले नाही त्यापेक्षा जास्त शेतकर्‍यांनी देशात आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या म्हणजे राष्ट्रीय आपत्ती असल्याचे मी मानतो. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी आता कृषी क्षेत्रात स्थायी समाधान शोधणे गरजेच आहे, असे प्रतिपादन भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी येथे आयोजित ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात ते बोलत होते.


मोदी यांचे सायंकाळी पाच वाजता आर्णी तालुक्यात आगमन झाले. तेथून ते गारपिटीमुळे नुकसान झालेल्या कैलास अरणकर यांच्या शेतात पाहणीसाठी गेले. याठिकाणी त्यांनी शेतकर्‍यांसोबत चर्चा केली. दाभडी येथील सरपंच संतोष टाके यांनी कापूस तसेच सोयाबीन पिकाच्या भावाचा प्रश्न त्यांच्या समोर मांडला. देशात कुपोषणाची समस्या आहे. यावर सोयाबीन हे पोषण म्हणून उत्तम आहार ठरू शकते. त्यामुळे सोयाबीन उत्पादनाला प्रोत्साहन दिल्यास शेतकर्‍यांनासुद्धा चांगला फायदा मिळू शकतो, असे मोदी यांनी सांगितले. कापूस ज्याठिकाणी पिकतो त्याच परिसरात दोरा तयार झाला पाहिजे. याशिवाय रेडीमेड गारमेंट चा व्यवसायसुद्धा त्याच परिसरात विकसित झाला पाहिजे. मात्र तशा दृष्टीकोनातून आजपर्यंत विचारच केला गेला नसल्याचा आरोप मोदी यांनी केला.


सावकारांवर प्रहार: आजही शेतकर्‍यांना सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. बॅकांना शेतीसाठी कर्ज देणे सक्तीचे करायला हवे. तरच देशातील शेतकरी सावकारमुक्त होईल. तसेच विमा कंपन्यांच्या नियमांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. आज विमा कंपनीकडून नुकसानीचे पैसे घेणे म्हणजे शेतकर्‍यांना लोखंडाचे चणे चावल्यासारखे वाटत असल्याचे सांगत मोदींनी देशातील विमा नीतीवरही टीका केली.


आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांशी संवाद : ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमानंतर नरेंद्र मोदी यांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्रातील 300 शेतकरी दाभडी येथे आले होते. समस्या ऐकून घेतल्यानंतर त्यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. ‘तुमच्या वेदना मला शेती क्षेत्रात काही तरी वेगळे करण्यासाठी प्रोत्साहित करीत राहील’ असा विश्वास मोदी यांनी दाभडी येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दिला.


‘साहब, महाराष्ट्र को गुजरात बनाओ’
नरेंद्र मोदी यांनी आज दाभडी येथील एका शेतात जाऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला. याठिकाणी शेतकर्‍यांनी अनेक समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. शंभुजी धुर्वे यांनी तर ‘साहब, महाराष्ट्र को गुजरात बनाओ. खेती का विकास किया तो आदमी का भी विकास होगा,’ अशी आर्त आळवणी मोदींसमोर केली. त्यावर ‘मिलकर कुछ करेंगे’ असा शब्दांचा आधार मोदींनी शेतकर्‍यांना दिला.