आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi,BJP, Balasaheb Thackeray, Divya Marathi

बाळासाहेबांची आठवण काढून मोदींनी जिंकली शिवसैनिकांचीही मने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - देशभर झंझावती प्रचारदौरे करत निघालेले भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रथमच महाराष्‍ट्रात शिवसेना उमेदवारासाठी अमरावतीत सभा घेतली. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई व वर्धा येथे झालेल्या सभेत मोदींनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नामोल्लेखही न केल्याने तमाम शिवसैनिक व खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंमध्ये निर्माण झालेली नाराजीही यानिमित्ताने त्यांनी दूर केली. ‘महाराष्‍ट्रातून सर्व जागांवर भाजप- शिवसेनेचे उमेदवार विजयी करा, हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली ठरेल,’ असे भावोद्गार काढत मोदींनी तमाम शिवसैनिक व बाळासाहेबप्रेमी जनतेची मने जिंकली. विशेष म्हणजे, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर मराठवाडा व विदर्भात उच्चांकी गर्दीचा विक्रमही या सभांच्या निमित्ताने मोदींच्या नावावर नोंदला गेला.


भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मुंबईत ‘एल्गार रॅली’ घेऊन भव्य शक्तिप्रदर्शन केले होते. मात्र त्यावेळी मित्रपक्ष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या रॅलीचे साधे निमंत्रणही दिले नव्हते, तसेच आपल्या भाषणात त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा नामोल्लेखही केला नव्हता. त्यामुळे उद्धव ठाकरे व शिवसैनिकांत नाराजी होती. निवडणुका जाहीर झाल्यानंतर काही दिवसांपूवी मोदींनी महाराष्‍ट्राचा दौरा केला. वर्धा येथे झालेल्या जाहीर सभेतही त्यांनी ठाकरे किंवा मित्रपक्ष शिवसेनेचा उल्लेख केला नव्हता. त्यामुळेही शिवसैनिकांत नाराजीची भावना वाढत गेली.
दरम्यानच्या काळात शिवसेनेचे राष्‍ट्रीयत्व टिकवण्याच्या नावाखाली उत्तर प्रदेशात उमेदवार देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यातही नरेंद्र मोदी निवडणूक लढवित असलेल्या वारासणीतही शिवसेना उमेदवार देणार असल्याची चर्चा घडवून आणण्यात आली. उत्तर प्रदेशात शिवसेनेचे बळ फारसे नसले तरी हिंदू मतांचे विभाजन होऊ नये म्हणून मोदींनी हा विषय गांभीर्याने घेतला व लगोलग उद्धव ठाकरेंशी दूरध्वनीवरून चर्चाही केली. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा ‘हेतू’ साध्य झाला.


दुस-या टप्प्यात महाराष्‍ट्रात प्रचार दौ-यावर आलेल्या नरेंद्र मोदींनी शिवसेनेकडे असलेल्या अमरावती मतदारसंघात सभा घेतली. इतकेच नव्हे तर ‘कॉँग्रेसमुक्त महाराष्‍ट्र करून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करा’ अशी साद शिवसेना-भाजपच्या नेत्यांना घातल्यामुळे शिवसैनिकांत उत्साह संचारला आहे. मोदींच्या या एका वाक्यामुळे भाजप व विशेषत: मोदींबाबत शिवसैनिकांत असलेला संभ्रम दूर करण्याचे कौशल्य साधण्यात भाजपला यश आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


भाषणाची सुरुवात मराठीतून
‘मंचावर बसलेले माझे मित्र सुभाष देसाई, देवेंद्र फडणवीस आणि महानुभाव...’ असा मराठीतून नामोल्लेख करत मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली. ‘अमरावतीच्या अंबामातेला नमन करतो...’, असे उदगार काढत त्यांनी मोदी स्टाइलने मने जिंकली.


पत्रकार ‘पॉलिटिकल पंडित’
भाषणाच्या सुरुवातीलाच मोदी यांनी पत्रकारांना ‘पॉलिटिकल पंडित’ अशी उपमा दिली. निवडणुकीत कोण निवडून येणार, याचे सर्वेक्षण करण्यापेक्षा प्रत्यक्ष सभास्थळी येऊन बघा, असे आवाहन त्यांनी प्रसारमाध्यमांना केले.


‘लुटो बाटो टॅक्स’
महाराष्ट्र सरकारने महापालिकांमध्ये एलबीटी लागू केला आहे. यामुळे व्यापा-यांचे जगणे कठीण झाले असून व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. हा एलबीटी म्हणजे महाराष्ट्र सरकारचा ‘लुटो बाटो टॅक्स’ असल्याचे मोदी म्हणाले.


इस बार कमल खिला तो विदर्भपर विशेष ध्यान
‘अडसूलजी.. कसे आहात..? गुढीपाडवा की शुभकामनाएं.. भाई, आपका क्या कहना.. आपका नाम भी अच्छा है और काम भी..’ अमरावतीच्या सभेत नरेंद्र मोदींनी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याशी केलेला हा संवाद... तेथून अकोल्यात येताच त्यांनी खासदार संजय धोत्रेंशी तितक्याच आपुलकीने संवाद साधला. ‘इंजिनिअर साहब.. भाई दौरा अच्छा रहा... अमरावती में अडसूलजी.. यहाँ आप और बुलडाणा में प्रतापरावजी... इस बार कमल खिला तो उसकी सुगंध पश्चिम विदर्भ तक पहुचानी होगी’ अशा शब्दांत त्यांनी सूचक संदेशही दिला. ‘नमो’चे सरकार आले, तर पश्चिम विदर्भाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळण्याचे तर हे संकेतच होते.. असा दावा भाजप नेत्यांतून केला जात आहे.