आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राष्ट्रवादी’ तिकिटासाठी बूब, राणा यांच्यात रस्सीखेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनीत कौर राणा आणि शिवसेनेचे माजी शहरप्रमुख व अपक्ष नगरसेवक दिनेश बूब या दोन उमेदवारांचा गांभीर्याने विचार सुरू केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रिपाइंचे डॉ. राजेंद्र गवई यांच्याकडून ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवण्याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची स्पष्टता राष्ट्रवादीच्या निवडणूक समितीपुढे गेली नसल्याने अखेर नवनीत कौर आणि दिनेश बूब या दोघांमध्येच आता राष्ट्रवादीच्या तिकिटासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील समस्या व राजकारण लक्षात घेता दिनेश बूब यांच्याबाबत पक्षाने सकारात्मक विचार सुरू केल्याची माहिती आहे.


अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती या प्रवर्गाकरिता राखीव आहे. नवनीत कौर राणा या जातप्रमाणपत्रावरून निर्माण झालेल्या वादामुळे सध्या अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे जातप्रमाणपत्राबाबत सुरू असलेल्या शंकाकुशंकांचे निरसन झाल्याशिवाय राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. दिनेश बूब यांच्याकडे उमेदवार म्हणून बघताना राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मतैक्यसुद्धा झाले आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिनेश बूब यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली, तर शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्याशी बूब यांची होणारी लढत ही लक्षवेधी ठरण्याचीच शक्यता बळावली आहे. दिनेश बूब आणि अडसूळ हे दोन्ही शिवसैनिकच असल्यामुळे त्यांच्यातील लढत रंगतदार ठरेल. पाच वर्षांपूर्वी आनंदराव अडसूळ यांनी अमरावतीतून पहिल्यांदाच निवडणूक लढवली तेव्हा दिनेश बूब शिवसेनेतच होते. मात्र, त्यानंतर बूब यांनी शिवसेनेतच राहून बंडखोरी करीत महापालिकेची निवडणूक अपक्ष लढवली आणि नगरसेवक म्हणून निवडून आले. शिवसेनेच्या अमरावतीत जिल्ह्यातील राजकारणाला सुरुवात झाली तेव्हापासून म्हणजे 1985 पासून दिनेश बूब यांनी शिवसेनेत विद्यार्थी सेनाप्रमुख, शहरप्रमुख अणि जिल्हाप्रमुख अशा विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे.

स्थानिक उमेदवाराला प्राधान्य
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांना सक्षमपणे लढत देऊ शकणार्‍या उमेदवाराच्या शोधात राष्ट्रवादी काँग्रेस आहे. दुसरीकडे मात्र स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य देण्याचा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचा विचार आहे.