आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो विद्यार्थी आज घेणार राष्ट्रध्वज सन्मानाची शपथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शहरातील शाळांमध्ये शुक्रवारी (दि. 24) हजारो विद्यार्थी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याची शपथ घेऊन दैनिक ‘दिव्य मराठी’चे ‘राष्ट्रध्वज सन्मान’ अभियान प्रत्यक्षात उतरवतील.

शहरांतील बहुतांश शाळा अभियानात सहभागी झाल्यात. गणतंत्रदिनी विकत घेतलेल्या प्लास्टिक व इतर राष्ट्रध्वजांची नंतर होणारी अवहेलना ही चिंतेची बाब झाली आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ‘दिव्य मराठी’ने राष्ट्रध्वज सन्मान अभियान हाती घेतले आहे. या अभियानामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यात नक्कीच यश येईल, असा विश्वास सिनेकलाकार, गीत-संगीतकार, साहित्यिक तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांनी व्यक्त केला आहे.

दोन टप्प्यांमध्ये हे अभियान राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील अधिकाधिक शाळांना ‘दिव्य मराठी’ने संपर्क साधून अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. शिवाय विविध क्षेत्रांतील नामवंतांच्या राष्ट्रध्वजाविषयीच्या भावना वाचकांपर्यंत पोहचवण्यात आल्या. बहुतांश शाळा या अभियानात सहभागी झाल्यात. शुक्रवारी दुसर्‍या टप्प्यात शाळांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांना आयुष्यभर राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याची शपथ देणार आहेत. ही शपथ घेणारे विद्यार्थी आयुष्यभर राष्ट्रध्वजाचा सन्मान राखतील आणि इतरांनाही सन्मान राखण्याची विनंती करतील.

शाळांना आवाहन
अभियानात सहभागी होण्यासाठी काही अडचणींमुळे संपर्क साधू न शकलेल्या शाळांनी प्रार्थनेच्या वेळी मुख्य अंकाच्या पहिल्या पानावर प्रकाशित केलेली शपथ विद्यार्थ्यांना द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. शहरातील नामवंतांनीही अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

‘दिव्य मराठी’ने सुरू केलेल्या ‘राष्ट्रध्वज सन्मान’ अभियानाची विभागीय आयुक्त दत्तात्रय बनसोड यांनी दखल घेतली. शहरातील पन्नासहून अधिक शाळा या अभियानात सहभागी झाल्या आहेत. अभियानांतर्गत या शाळांतर्फे शुक्रवारी (दि. 24) प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याची शपथ देण्यात येईल.अभियानात शासकीय शाळांनी सहभागी व्हावे, याकरिता प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे यांना विभागीय आयुक्तांनी सूचना दिल्या. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सर्वांनीच राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा. ध्वजाचा अवमान होऊ देऊ नका. प्लास्टिक वा कागदी राष्ट्रध्वज इतरत्र पडणार नाहीत याची दक्षता घ्या, असे आवाहन बनसोड यांनी केले आहे.