आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राणांहून प्रिय आम्हा हा राष्ट्रध्वज आमुचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी- उगवत्या सूर्याची सोनेरी सकाळ, थंड हवेतील गारवा अन् पक्ष्यांचा किलबिलाट; अशा प्रसन्न वातावरणात शुक्रवारी शाळाशाळांमध्ये घंटा वाजली नि विद्यार्थ्यांच्या शिस्तीत रांगा लागल्या. हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी राष्ट्रध्वजाच्या सन्मानाची शपथ घेतली. शहरातील बहुतांश खासगी आणि शासकीय शाळांनी ‘राष्ट्रध्वज सन्मान’ अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविध सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवत त्याला जनअभियानाचे स्वरूप दिले.

‘प्राणप्रिय राष्ट्रध्वज सदैव उंच आकाशी फडकत राहील. प्रसंगी आम्ही प्राणही देऊ, पण त्याची प्रतिष्ठा कमी होऊ देणार नाही. राष्ट्रध्वज झुकू देणार नाही. त्याला जमिनीवर पडू देणार नाही.’ अशी शपथ घेत शहरातील प्राथमिक-माध्यमिक शाळा, शिशुमंडळे ‘राष्ट्रध्वज सन्मान’ अभियानात सहभागी झाली आहेत. पालक असोत की स्कूल बसचे चालक, वाहक, शाळेचे शिक्षक, पदाधिकारी वा कर्मचारी, सर्वांनी ही शपथ घेतली आहे. प्रत्येक शाळेच्या मैदानावर विद्यार्थी-शिक्षकांनी शपथ घेतली. प्रार्थना अन् राष्ट्रगीतानंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून ही शपथ देण्यात आली. या अभियानामुळे शालेय मुलांमध्ये यामुळे राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत होईल, अशा प्रतिक्रिया मुख्याध्यापक अनं् शिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.

सामाजिक संघटनांचा सहभाग
‘राष्ट्रध्वज सन्मान’ अभियानात शहरातील काही सामाजिक संघटना आणि मित्रमंडळांनीही सहभाग घेतला आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी घेण्याचा अन् याविषयी जागृती करण्याचा संकल्प या प्रसंगी अनेकांनी केला.

राष्ट्रध्वजाचा असा करावा सन्मान
राष्ट्रध्वजाचा सन्मान कसा करावा, या विषयी केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रध्वज संहिता तयार केली आहे. या संहितेनुसार राष्ट्रध्वजाचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. सर्वांना दिसेल अशा जागी राष्ट्रध्वज फडकवावा. सुटीचा दिवस किंवा प्रतिकू ल परिस्थितीही तो फडकवला गेला पाहिजे. ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये. ध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फाटणार नाही अशा पद्धतीने बांधावा.

शिक्षकांनी दिले राष्ट्रप्रेमाचे धडे
प्रत्येक विद्यार्थ्याने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला पाहिजे. कागदी राष्ट्रध्वज शक्यतो बाळगू नये. ते रस्त्यावर कुठेही पडलेले असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. ते उचलून योग्य ठिकाणी ठेवण्याचे कष्ट घ्यावेत. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची प्रत्येक विद्यार्थ्यांने खबरदारी घ्यायची आहे, असे धडे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रार्थनेदरम्यान दिले.