आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Congress Party News In Marathi, Amravati Lok Sabha Seats

निवडणुकीचा आखाडा: अमरावतीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेश महासचिव संजय खोडके यांच्या विरोधाला न जुमानता नवनीत कौर राणा यांना दिलेली उमेदवारी आणि तातडीने किशोर शेळके, अविनाश मार्डीकर यांना पायउतार करून नव्याने केलेल्या नेमणुकांमुळे अमरावतीत ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’ असे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, या नव्या वादात पक्षाचे खरे पदाधिकारी कोण, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.


दरम्यान, शरद पवार यांच्या शनिवारी (दि. 29) शहरात होत असलेल्या सभेपूर्वी संजय खोडके यांना मुंबईत भेटीसाठी बोलावले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर सभेत घोषणा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि मनपा गटनेता या पदांवर नवे शिलेदार नियुक्त केले. मात्र, आव्हाड यांची ही कृती आचारसंहितेचा भंग करणारी असल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केल्याने प्रकरणाला नवे वळण लाभले आहे. राष्ट्रवादीचे 17 व आणखी चार नगरसेवक आजही संजय खोडके यांच्यासोबत आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा ठाकरे, विजय भैसे, प्रदीप राऊत, प्रल्हाद सुंदरकर, संगीता ठाकरे, शरद तसरे ही सर्व मंडळी एकीकडे आणि संजय खोडके, सुलभा खोडके, किशोर शेळके, अविनाश मार्डीकर, प्रशांत डवरे ही मंडळी दुसरीकडे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तट निर्माण झाले आहेत.


राष्ट्रवादीची तक्रार राष्ट्रवादीविरुद्ध
जितेंद्र आव्हाड यांच्या घोषणेनंतर नव्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव शिवाजीराव गर्गे यांनी विभागीय आयुक्त आणि मनपा आयुक्तांना पाठवले. यावर आक्षेप घेणारी तक्रार राष्ट्रवादीच्याच पदाधिकार्‍यांनी केली. एकाच पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी परस्परांविरोधात तक्रार करण्याच्या या कृतीमुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.


खोडकेंच्या समजुतीचा प्रयत्न
संजय खोडके यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. अद्याप पक्षीय शिस्तभंगाची कोणतीही कार्यवाही केलेली नाही. खोडकेंनी समजून घ्यावे. याबाबत गुरुवारी (दि. 27) संजय खोडके आणि माझी एकत्र बैठक होणार आहे. भास्कर जाधव, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस