आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंघटित गुन्हेगारांशी मोक्काच्या मदतीने संघर्ष करत असलेल्या राज्य सरकारपुढे आता राजकारणातील संघटित दादागिरी रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आज बुलडाण्यात व्यासपीठावर जाऊन पालकमंत्र्यांवर शाई फेकण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका अपंग कार्यकर्त्याने केलेले कृत्य आणि गेल्या काही दिवसांत विदर्भात घडलेले असे प्रकार पाहता राजकारणातील संघटित दादागिरी भविष्यात मोठी डोकेदुखी ठरू शकते. आजच्या बुलडाण्यातील घटनेसाठी सांगण्यात येत असलेले अपंगांच्या पुनर्वसनाचे कारण वरकरणी खरे वाटत असले तरी त्यामागे सहकाराचा स्वाहाकार केलेले संघटित दादा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. घराण्यातील बाळंतविडा ते साखरपुडा, वाढदिवसापासून तर अंत्यसंस्कार व तेरवीपर्यंतच्या खर्चासाठी पूर्वजांनी सहकारी संस्था अक्षरश: ओरबडून खाल्ल्या. त्यांच्याच नव्या पिढीने या सहकारी संस्था बंद होईपर्यंत तेथे धुडगूस घालण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. आता चरण्यासाठी एक सुरक्षित कुरण म्हणून या संस्थांची गरज दुसर्या पिढीला वाटू लागली आहे. त्यासाठीच वरपासून खालपर्यंत संघटित दादागिरी सुरू असून, ती दिवसेंदिवस उग्ररूप धारण करत आहे. या संघटित दादागिरीचाच प्रताप म्हणून बुलडाण्यात घडलेल्या प्रकाराकडे पाहता येईल. कारण संघटित दादागिरीच्या पाठिंब्याशिवाय एखादा स्थानिक अन् तोही अपंग सेलचा राष्ट्रवादी आपल्याच पक्षाच्या पालकमंत्र्यांवर शाई फेकण्याचे कृत्य करू शकतो, यावर कुणाचाही विश्वास बसू शकत नाही.
शेतकर्यांच्या घामावर उभ्या राहिलेल्या सहकारी संस्था ओरबडून खायच्या, त्या बंद पाडायच्या आणि त्या पुन्हा सुरू करण्यासाठी मंजूर होणार नाही अशा प्रकारचा राजीनामा लिहून राजकीय किंमत चुकवत असल्याची नौटंकी करायची, हे न समजण्याइतकी आजची जनता दुधखुळी राहिलेली नाही. आरबीआयचे सर्व नियम गुंडाळून शेतकर्यांची संस्था ओरबडून खाण्याचा सल्ला या संघटित दादांना व त्यांच्या पूर्वजांना राज्य सरकारने दिला नव्हता. त्यामुळे हातात कटोरा घेऊन राज्य सरकारकडे भीक मागण्याचा कोणताही हक्क या दादांना राहिलेला नाही. त्याकरिता दादागिरी करण्याचा हक्क तर या दादांना मुळीच राहिलेला नाही. ही संघटित दादागिरी फक्त बुलडाण्यापुरती र्मयादित असती तर त्याकडे कुणीही दुर्लक्ष केले असते.पण, गोंदियापासून तर कोल्हापूरपर्यंत या संघटित दादागिरीचे नवनवीन रूप अलीकडे बघावयास मिळत आहे. नागपूरची जिल्हा बँक तेथल्या दादाने डबघाईस आणली. त्यासाठी मध्यंतरी काहीकाळ तुरुंगाची हवाही खावी लागली. अलीकडे त्या बँकेतील घोटाळ्यांचा चौकशी अहवाल व त्यात बँकेला झालेल्या हानीची वसुली करण्याची शिफारस आली. त्या बँकेतील नेमक्या या घोटाळ्याशी संबंधित रेकॉर्ड असलेल्या मजल्यालाच अलीकडे आग लागली.
दोन पिढय़ांच्या दादागिरीने डबघाईस आलेली वर्धेची बँकही राज्य सरकारच्या मदत निधीची चातकासारखी वाट पाहत आहे. यवतमाळमधील दादागिरी अधूनमधून कोणत्या ना कोणत्या रुपाने चव्हाट्यावर येत असते. त्या बँकेतील एका दादाची मुलीच्या लग्नात जावयाला द्यावयाच्या चारचाकीसाठी कर्मचार्यांकडून सामूहिक लाच घेण्यापर्यंत मजल गेली होती. त्याची दादागिरी पुसदकरांनी फार काळ चालू दिली नाही म्हणून बरे झाले. याच यवतमाळच्या राजकारणात अचानक उगवलेल्या दादाच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या बैठकीत पदाधिकार्याला मारहाण करून यवतमाळच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय सुरू केला आहे. या नव्या दादागिरीमुळे यवतमाळात पूर्वी संघटित दादागिरी करणारे पार हादरून गेले आहेत. राजकीय स्टंट म्हणून शेतकर्याचा मृतदेह जिल्हा कचेरीवर नेऊन तुरुंगात जाण्याचा अमरावतीमधला प्रकारही संघटित दादागिरीतच मोडणारा आहे.
अमरावतीच्या या दादागिरीचा हिवाळी अधिवेशनातील स्टंट मात्र विधानसभा उपाध्यक्षांनी हाणून पाडला. केवळ हाणूनच पाडला नाही तर ही दादागिरी आता खूप झाली असे सांगून निलंबनाचा बडगाही त्यांनी उगारला. नांदेडमध्येही दादागिरीमुळेच तेथील जिल्हा बँक मध्यंतरी अडचणीत आली होती. अडचणीतून बँकेला बाहेर काढण्यासाठी तेथील दादांनी कर्जमाफीपासून वंचित ठेवून शेतकर्यांनाच अडचणीत आणले होते. कारण सरकारकडून पैसे घेऊन शेतकर्यांचे थकित कर्ज फेडल्यामुळे तेथील बळीराजाला कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता. बीडमध्ये संघटित दादागिरी करून बँकेला अडचणीत आणणारेच आता अडचणीत आले आहेत. दादागिरीमुळे अटळ असलेली संभाव्य अटक टाळण्यासाठी बीडमधील दादांची सध्या धावपळ सुरू आहे. उस्मानाबादमध्ये पूर्वी दादागिरी केलेल्यांना आता इतरांच्या संघटित दादागिरीला तोंड द्यावे लागत आहे. सोलापूर, कोल्हापूर असो की नंदूरबार-धुळे सर्वत्र संघटित दादागिरीपुढे सरकार हतबल झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. संघटित गुन्हेगारांच्या मुसक्या बांधण्यासाठी सरकारला मोक्का आणावा लागला. असाच कठोर कायदा राजकारणात संघटित दादागिरी करणार्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी करण्याची वेळ आता आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.