आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Natural Disasters News In Marathi, Hailstorm Fall In Amravati, Divya Marathi

कोसळले अस्मानी संकट, चांदूररेल्वेत बटाट्याच्या आकाराची गारपीट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरुड, तिवसा- चोहीबाजूने या ना त्या संकटाने पछाडलेल्या शेतकर्‍यांवर निसर्गाने परत एकदा तडाखा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी काही भागांत झालेल्या पावसानंतर रविवारी जिल्ह्यातील काही भागांत अवकाळी पावसासह गारपिटीचे अस्मानी संकट कोसळले. याचा सर्वाधिक तडाखा चांदूररेल्वे, तिवसा तालुक्यातील कुर्‍हा परिसर आणि वरुड तालुक्याला बसला आहे.

दुपारी बाराच्या सुमारास वातावरण ढगाळले होते. वरुड तालुक्यामध्ये रविवारी अवकाळी पाऊस, वादळ, गारपीट झाली. यामध्ये पुसला, वरुड, शेंदूरजनाघाट, जरुड, बेनोडा, जामगाव, खडका, लोणी, लिंगा आदी परिसरात तासभर अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या, तर काही ठिकाणी बोराच्या आकाराची गारपीट झाली. यामध्ये संत्र्यांसह रब्बी हंगामातील गहू, हरभरा आदी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील सावंगी जिचकार शिवारामध्ये वीज पडून सात मेंढय़ा दगावल्या. शेतकर्‍यांवर परत एकदा अस्मानी संकट ओढवल्याने संत्रा उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट आहे. याबरोबरच तिवसा परिसरातील कुर्‍हा परिसरातही जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले.

दुपारी पावणेचार वाजता कुर्‍हा परिसरामध्ये अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीने शेतकर्‍यांची तारांबळ उडाली. तब्बल अर्धा तास झालेल्या गारपिटीमुळे शेतातील गहू झोपला. हरभरा, संत्रा, केळी, कांदा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही शेतकर्‍यांचा सोंगणीला आलेल्या हरभर्‍याचेही नुकसान झाले असून, गंजी घालून ठेवण्यात आलेला हरभराही भिजला. या अस्मानी संकटामुळे सर्वत्र धावपळ पाहावयास मिळाली. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ढगाळलेले वातावरण होते.

  • चांदूररेल्वेत बटाट्याच्या आकाराची गारपीट
  • खरीपानंतर रब्बीलाही फटका
  • तिवसा, वरुडलाही बसला जोरदार फटका
  • सावंगी येथे वीज पडून सात मेंढय़ा दगावल्या
  • अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे कुर्‍हा परिसरामध्ये शेतात असे पाणी साचले होते.
  • चांदूररेल्वे तालुक्यामध्ये बटाट्याच्या आकाराच्या गारांचा असा थर साचला होता.