आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीसाठी ‘व्हॅलिडिटी’ची नाही गरज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-राष्ट्रवादी काँग्रेस खासदारकीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा गुंता ताजा असतानाच, लोकसभा निवडणुकीत जात पडताळणी प्रमाणपत्राची (व्हॅलिडिटी) कोणतीही गरज नसल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हॅलिडिटी हा प्रकार केवळ महाराष्ट्रातच लागू होत असल्याने लोकसभा निवडणुकीसाठी त्याचा कोणताही संबंध येत नाही, असे यंत्रणेचे म्हणणे आहे. त्यामुळे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती लोकसभेची उमेदवारी दाखल करणार्‍या उमेदवारांना केवळ जातीच्या दाखल्याचीच प्रत अर्जासोबत जोडावी लागेल. निवडणूक प्रक्रियेतील या महत्त्वाच्या माहितीमुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.
अमरावती लोकसभेची निवडणूक 10 एप्रिल रोजी होत आहे. त्यासाठी आगामी 15 ते 22 मार्चदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केले जातील.अमरावती मतदारसंघ आरक्षित असल्याने येथे अनुसूचित जातीचा व्यक्तीच उभा राहू शकतो. परंतु, त्यासाठी संबंधितांना आपल्या उमेदवारी अर्जासोबत व्हॅलिडिटी प्रमाणपत्र सादर करावे लागेल, असे बोलले जात होते. राज्यात ग्रामपंचायतीसारख्या अत्यंत छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगर पंचायत, महानगरपालिका आदी सर्व निवडणुकांसाठी व्हॅलिडिटी आवश्यक आहे. त्यामुळे लोकांचे सभागृह म्हणून ओळख असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी तर ते लागेलच, असे सर्व पक्षांचा समज होता. परंतु, व्हॅलिडिटीची गरज नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उमेदवारी दाखल करणार्‍या व्यक्तींना केवळ जातीचे प्रमाणपत्रच सादर करावे लागेल.एखाद्या उमेदवाराच्या जातीबद्दल जर कोणत्याही पक्षाला आक्षेप असेल, तर आक्षेपकर्त्यालाच संबंधित व्यक्तीची ती जात नसल्याचे आता सिद्ध करावे लागणार आहे.