आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभवानंतर राणांच्या आभारपत्राने विरोधक ‘खिंडीत’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- लोकसभेतील पराभवाने खचून न जाता नवनीत कौर राणा यांनी आगामी विधानसभा लढवण्याची तयारी चालवल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. जिल्हाभरातील मतदारांशी संपर्क साधण्यासाठी पाच लाख घरात नागरिकांचे आभार मानणारी पत्रकं पोहचवण्यात आली आहेत. ‘निवडणुकीत जय-पराजय होणारच, जनाधाराचा सन्मान करून यापुढेही आपण सामाजिक कार्यात अग्रेसर राहू’, अशा आशयाचा संदेश या पत्रकांमध्ये आहे. मतदारांचा सन्मान करून भावनिक साद घालणार्‍या या पवित्र्याने विरोधकही खिंडीत अडकले आहेत. ‘आदरणीय मातृशक्ती, पितृशक्ती व युवाशक्ती’ असे संबोधन असलेली सुमारे पाच लाख पत्रं विधानसभेच्या सहा मतदारसंघांममधील मतदारांना पाठवण्यात आल्याचे आमदार रवि राणा यांनी सांगितले. पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस-युवा स्वाभिमान असा उल्लेख करून राणा यांनी विधानसभेची छुपी रणनीती जाहीर केली आहे. आघाडीतील मतदारसंघ वाटणीनुसार, काँग्रेसकडे सहा, तर राष्ट्रवादीकडे दोन मतदारसंघ येणार आहेत. राणा दाम्पत्याने त्यावर आतापासूनच लक्ष केंद्रित केले. मात्र, दर्यापूर मतदारसंघाबाबत त्यांनी सध्या मौन बाळगले आहे.
2009 मधील निवडणुकीत रवि राणा बडनेरा मतदारसंघातून विजयी झाले होते. राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके यांचा त्यांनी तब्बल वीस हजार मताधिक्याने पराभव केला होता. आता संजय खोडके राष्ट्रवादीत नसल्याने रवि राणा यांना राष्ट्रवादीची उमेदवारी अथवा सर्मथनाची शक्यता बळावली आहे. दुसरीकडे मागील निवडणुकीत राकाँच्या कोट्यातील दर्यापूर मतदारसंघातून रिपाइंचे रामेश्वर अभ्यंकर लढले होते. आता रिपाइंसोबतची आघाडी संपुष्टात आल्याने अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव दर्यापूर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडे उमेदवार नाही. ही गोष्टही नवनीत राणा यांच्यासाठी पोषक ठरू शकते. मात्र, राकाँने सध्या तरी दर्यापूरबाबतचे गुपित उलगडले नाही. याबाबत आमदार राणा यांच्यासोबत ‘दिव्य मराठी’ने संपर्क साधला असता, नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी सांगितले.