आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Navneet Rana News In Marathi, Nationalist Congress, Amravati, Divya Marathi

मताधिक्याने होणार नवनीत राणांचा विजय; बैठकीतील निष्कर्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - नवनीत राणा किमान 30 हजार मतांच्या फरकाने लोकसभा निवडणूक जिंकणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. राकाँच्या ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीची बैठक शनिवारी येथील साईप्रस्थ मंगल कार्यालयात झाली. या बैठकीत ठिकठिकाणी झालेल्या मतदानाचा आढावा घेण्यात आला.


कुठे किती मतदान झाले, पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी जबाबदार्‍या पार पाडल्यात की नाहीत, मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी किती सहकार्य केले आदी बाबींची या बैठकीत मीमांसा करण्यात आली. त्यानंतर मतांची गोळाबेरीज व प्रतिस्पर्धी उमेदवाराला मिळणारी मते आदी बाबींचा अंदाज घेऊन घड्याळच विजयी होणार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय भैसे यांच्या उपस्थितीतील या बैठकीला विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रा. शरद तसरे, जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे, संतोष महात्मे व प्रदीप राऊत, विजय काळे, श्रीपाल पाल, भातकुलीचे अजीज पटेल आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये प्रत्येकाने आपापली भूमिका मांडली. गावा-गावांमध्ये झालेले मतदानाचे आकडे उपस्थितांसमोर ठेवले. शिवाय पक्षाने बूथनिहाय करून ठेवलेली योजना कशी प्रभावी होती, याची मांडणी केली. बैठकीत अमरावती वगळता बडनेरा, तिवसा, दर्यापूर, अचलपूर व मेळघाट या मतदारसंघांतील मतदानाचा आढावा घेण्यात आला. काँग्रेस व पीरिपा या पक्षांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म निभावला की नाही, याची माहितीही या वेळी घेण्यात आली.


आढावा घेणारा पहिला पक्ष : मतदाननंतर आढावा घेणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बहुदा पहिलाच राजकीय पक्ष आहे. राकाँ, शिवसेना, बसप, रिपाइं अशी चौरंगी लढत या मतदारसंघात होती. बहुजन समाज पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिवसेना-भाजप महायुती, आम आदमी पार्टी अशा प्रमुख पक्षांचे उमेदवार ही निवडणूक लढले; परंतु कोणीही निवडणुकांसंदर्भात अद्याप आढावा घेतलेला नाही.


खोडकेंच्या बंडाची किनार
राष्ट्रवादी काँग्रेसने तडकाफडकी आढावा घेण्याला पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांच्या बंडाची किनार असल्याचे बोलले जाते. खोडके यांनी उमेदवाराविरोधात उघड-उघड भूमिका स्वीकारली होती. उमेदवाराच्या निवड प्रक्रियेत पक्षाच्या प्रदेश पदाधिकार्‍यांनी विश्वासात घेतले नाही, असा त्यांचा आरोप होता. पक्षाच्या बैठकीला त्याचेही एक निमित्त असावे, असे बोलले जात आहे.

विजय आमचाच
सहाही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर विजय आमचाच असल्याचे दृष्टिपथात आले आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या तुलनेत मताधिक्य फारसे असणार नाही. किमान 30 हजारांचा फरक असेल, असा सध्याचा अंदाज आहे. विजय भैसे, राकाँ. ग्रामीण जिल्हाध्यक्ष, अमरावती.