आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीतर्फे भाजपच्या आश्वासनांचा पंचनामा, युवक’चे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याशी बातचीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ‘राज्यातील भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, या मागणीकरिता राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारविरोधात आक्रमक आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.
भाजपच्या सर्व आश्वासनांचा पंचनामा करण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला आहे. या आंदोलनाचा पहिला टप्पा मार्चमध्ये करण्यात येणार आहे,’ अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिली. राष्ट्रवादीचे पदाधिकारी अनिल ठाकरे आणि संगीता ठाकरे यांच्या अमरावती येथील निवासस्थानी पाटील यांनी खास ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला.
पाटील म्हणाले, की ‘भाजपने दिलेल्या टोलमुक्ती आश्वासनाचा सर्वप्रथम पंचनामा करण्यात येणार आहे’. सत्तेत येण्यापूर्वी राज्य टोलमुक्त करू, असे भाजपच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी जाहीर केले होते.
मात्र, सत्तेत आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता शब्द फिरवला आहे. दिलेल्या आश्वासनांनुसार राज्य टोलमुक्त करावे; अन्यथा मार्च मध्ये राज्यातील टोल नाक्यांवर आंदोलन करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. त्याचप्रमाणे एलबीटीमुक्त राज्य आणि धनगर समाजाला आरक्षण या दोन प्रमुख आश्वासनांचाही समाचार टोल आंदोलन झाल्यानंतर लगेचच घेण्यात येईल, असे उमेश पाटील यांनी सांगितले.
पक्षाची बदनामी ही वस्तुस्थिती
आघाडीसरकारच्या काळात घोटाळ्यांचे आरोप झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीवर विपरीत परिणाम होतोय का, याबाबत पाटील यांना विचारले असता, त्यांनी इन्कार केला. पाटील म्हणाले, की सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी झाली, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, घोटाळ्यांबाबत आतापर्यंत नेमलेल्या सर्वच चौकशी समित्यांनी राष्ट्रवादीला ‘क्लीन चिट’ दिली आहे. त्यामुळे आता अँटिकरप्शन विभागाची चौकशी सुरू झाली. मात्र, या आरोपांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनावर कोणताही परिणाम नाही. सदस्यनोंदणीला उत्तम प्रतिसाद आहे. पक्षात दरदिवशी येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढतेय, असेही पाटील यांनी या वेळी सांगितले.
आरक्षणाच्या मागणीकरिता नागपूर ते मुंबई ‘लाँग मार्च’
राज्यातीलधनगर समाजाला भाजपने आरक्षण देण्याचे आश्वासन सत्तेत येण्यापूर्वी दिले होते. या आश्वासनावर भाजपची भूमिका डळमळीत आहे. त्याचप्रमाणे मराठा आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने दुटप्पी धोरण स्वीकारले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात निर्णय घेऊन मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय रेंगाळत ठेवला. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीकरिता नागपूर ते मुंबई असा लाँग मार्च राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते काढणार आहेत. नागपूरपासून सुरू झालेली ही यात्रा मुंबईला संपेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
तीन तास ठेवणार टोलनाके बंद
मार्चच्यापहिल्या आठवड्यात राज्यातील सर्व टोल नाक्यांवर एकाच वेळी आंंदोलन करण्यात येईल. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते एकाच वेळी टोल नाक्यांवर जमतील. शांततेच्या मार्गाने आंदोलन होईल. तीन तासपर्यंत टोल नाक्यावरून ये- जा करणाऱ्या वाहनांकडून टोल वसूल करू देणार नाही. टोलच्या शुल्कापासून राज्यातील वाहने तीन तास मुक्त करू. हे प्रतीकात्मक आंदोलन असणार आहे. या नंतरही टोलमुक्ती झाली नाही, तर मात्र अत्यंत प्रभावीपणे आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.