आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेबारा कोटींवर काँग्रेस-राष्ट्रवादीत समेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अमरावती विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठीच्या साडेबारा कोटींच्या वाटपावरून उद्भवलेल्या वादात अखेर पक्षनेते बबलू शेखावत यांची शिष्टाई यशस्वी ठरली. राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि जनविकास कॉँग्रेसचेही याप्रकरणी समाधान झाले असून रावसाहेब शेखावत यांच्या यादीवरील त्यांचे आक्षेप निवळले आहेत.

अमरावती विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचे नियोजन करताना आमदार रावसाहेब शेखावत यांनी काँग्रेस नगरसेवकांना झुकते माप दिल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने या यादीवर आक्षेप घेतला होता.

काँग्रेसने छुप्या पद्धतीने आमदारांच्या यादीतील कामांना प्राधान्यक्रम दिल्याने महापालिकेत चांगलाच वादंग निर्माण झाला होता. त्यावर उपमहापौर नंदकिशोर वर्‍हाडे तसेच जनविकास काँग्रेसच्या प्रा. सुजाता झाडे यांनी आमदार रावसाहेब शेखावत यांना निधीच न देण्याबाबत आगामी आमसभेत प्रस्ताव आणण्याची तयारी चालवली होती.

उपमहापौरांनी पत्रकार परिषद घेत याबाबत भूमिका ठेवली, तर दुसरीकडे त्या कामांची निविदा प्रक्रिया त्याच दिवशी करण्यात आली. त्यातील काही कामांच्या निविदा राखून ठेवण्यात आल्या होत्या. उर्वरित कामांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तसेच जनविकास काँग्रेसच्या नगरसेवकांना सामावून घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. जनविकास काँग्रेसच्या नगरसेवकांनीदेखील याबाबत दुजोरा दिला आहे. आता या प्रकरणावर पडदा पडला असून, प्रकरण निवळले आहे.

निधी मिळाल्याने तक्रार नाही
काँग्रेस पक्षनेत्यासोबतच्या चर्चेदरम्यान वार्डातील विकासकामांसाठी निधी देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. जनविकास काँग्रेसच्या नगरसेवकांना योग्य व आवश्यक निधी दिला जाणार असल्याने कोणतीही तक्रार नाही. हा मुद्दा आता निकाली निघाला आहे. प्रकाश बनसोड, गटनेते , जनविकास-रिपब्लिकन फ्रंट

सर्वांचे समाधान झाले
अमरावती विधानसभा मतदारसंघात येणार्‍या सर्व नगरसेवकांना साडेबारा कोटी रुपयांमधून निधी देण्याचा प्रयत्न आमदार रावसाहेब शेखावत यांनी केला आहे. निधी वाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काही नगरसेवकांचा आक्षेप होता. गटनेत्यांची बैठक घेत सर्वांचे समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बबलू शेखावत, पक्षनेते महापालिका