आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वर्‍हाड’ निघालंय शिवसेनेत; अस्वस्थता वाढली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राष्ट्रवादी काँग्रेसमधून निष्कासित करण्यात आलेले प्रदेश महासचिव संजय खोडके यांच्या ‘मातोर्शी’वरील संपर्कामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. खोडके यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झाल्यास जिल्ह्यासोबतच महापालिकेतील राजकारणालाही कलाटणी मिळण्याची शक्यता राजकीय वतरुळात व्यक्त होत आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली होती. खोडके यांचा उमेदवारीला विरोध असतानाही पक्षनेतृत्वाने निर्णय बदलला नाही. यामुळे नाराज खोडके यांनी बहुजन पक्षाचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्या पाठीशी ताकद उभी केली. मात्र, मतदानाच्या दिवशी खोडके सर्मथक शिवसेना उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या बाजूने प्रचार करताना आढळून आले होते. महायुतीला भरघोस यश मिळाल्यामुळे खोडके यांच्याकडून सत्तापक्षाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा अंदाज राजकीय जाणकारांनी वर्तवला होता. संजय खोडके शिवसेनेत यावेत म्हणून येथील वरिष्ठ नेत्यांनीही प्रयत्न केल्याची माहिती आहे. कारण खोडके यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढणार, यात शंका नाही. मात्र, त्यामुळे अनेक दिवसांपासून विधानसभा उमेदवारीची आशा बाळगून असलेल्या शिवसेनेतील पदाधिकार्‍यांच्या हे पचनी पडत नसल्याचे दिसून येत आहे.

सुलभा खोडके यांनी 2004-2009 दरम्यान विधानसभेत बडनेरा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, 2009 मध्ये रवि राणा यांनी त्यांचा मोठय़ा फरकाने पराभव केला होता. मात्र, पाच वर्षांत मतदारसंघ व जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र पालटले असून, रवि राणा यांच्या सल्ल्यानुसारच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या फेरबदल होत आहेत. जिल्ह्यातील संभाव्य उलथापालथीचा परिणाम आगामी दिवसांमध्ये दिसून येणार, यात शंका नाही. यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकांतील समीकरणाकडे सार्‍यांचे लक्ष लागले असून, खोडके शिवसेनेत प्रवेश करतात का, ते बाहेरूनच पुन्हा एकदा शिवसेनेला पाठिंबा देतात, यावर आगामी समीकरणे ठरणार आहेत.
आगामी महापौर कोण होणार?
महापालिकेत खोडके गटाचे वर्चस्व असून, राष्ट्रवादीत असताना त्यांनी काँग्रेससोबत अडीच-अडीच वर्षे महापौरपद विभागून घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बदलते समीकरण लक्षात घेऊन शिवसेनेने मोठय़ा नेत्याला महापौरपदाच्या शर्यतीत उतरवण्याची तयारी चालवली आहे. दुसरीकडे, काँग्रेसनेही तयारी चालवल्याचे समजते.
पदाधिकार्‍यांच्या संपर्कात ‘वर्‍हाड विकास’ : बडनेरा मतदारसंघात वर्‍हाड विकास मंचचे कार्यकर्ते शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. खोडके यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यास पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात येत आहेत. मात्र, संपर्काचे वृत्त शिवसेना पदाधिकार्‍यांनी फेटाळले आहे.

दावेदारांमध्ये धुसफूस : बडनेरा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय बंड, दिगंबर डहाके, प्रा. प्रशांत वानखडे यांनी तयारी सुरू केली होती. मात्र, खोडके यांची ‘मातोर्शी’शी जवळीक वाढल्यामुळे बंड यांनी बडनेरा व तिवसा हे दोन्ही मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केल्याचे सूत्रांकडून समजते.