आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टिक टिक’ वाजते डोक्यात.!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस दोन गटात विभागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शुक्रवारी कार्याध्यक्षांनी अमरावतीत घोषणा केल्यानंतर गटनेते बदलण्यासाठी प्रदेश कार्यकारिणी स्तरावरून हालचाली सुरू झाल्या आहेत.सर्व नगरसेवक आपल्याकडे असल्याचे दोन्हीकडून सांगितले जात असल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेतील पक्षांतर्गत राजकारण तापले असून, आगामी काही दिवसांमध्ये मोठय़ा प्रमाणात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यावरून जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. नवनीत राणा यांचा प्रचार करायचा की तटस्थ राहायचे, याबाबत द्विधा मन:स्थितीत असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर नवीन पदाधिकार्‍यांच्या घोषणेने नवीन पेचप्रसंग उभा राहिला आहे. महापालिकेत एकूण 23 नगरसेवकांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंट निर्माण करण्यात आला आहे. गटाची स्थापना करतेवेळी माजी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या सभेत शहराध्यक्ष म्हणून नितीन हिवसे कार्याध्यक्ष म्हणून चंद्रशेखर देशमुख आणि महापालिकेतील गटनेते म्हणून सुनील काळे यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. महापालिकेची निवडणूक ही संजय खोडके यांच्या नेतृत्वात लढवली गेली असून, राष्ट्रवादीला अपेक्षेनुरूप यशदेखील मिळाले. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी घोषित होण्यापूर्वी सर्व कुशलमंगल होते. मात्र, त्यानंतर याला ग्रहण लागले आणि खोडके गटाचा बुरूज ढळण्यास सुरुवात झाली.
स्थायी समिती निवडणुकीदरम्यान नियुक्तीवरून नाराजीला आणखीच हवा मिळाली. खोडके विरोधकांना संधी मिळाली आणि असंतोषाचे रूपांतर दसरा मैदानाच्या सभेत पाहावयास मिळाले. कार्याध्यक्षांनी सुनील काळे यांच्या नावाची घोषणा केली असली, तरी इतक्या सहजासहजी त्यांचा नवीन गटनेते म्हणून स्वीकार केला जाणार नाही. तसेच नगरसेवक गटनेते अविनाश मार्डीकर यांच्या पाठीशी उभे राहणार की पक्षादेश पाळणार हा देखील महत्त्वपूर्ण प्रo्न आहे. सद्य:स्थितीत काळे यांच्या बाजूने केवळ त्यांच्यासह तीनच नगरसेवक असल्याची स्थिती आहे, तर फ्रंटमधील 20 नगरसेवक मार्डीकर यांच्या बाजूने असल्याचे चित्र आहे. प्रदेश कार्यालयाकडून विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांना गटनेते बदलण्याबाबत पत्र प्राप्त झाल्यानंतर महापालिकेत सुनील काळे यांना सर्वमान्य करणार की दोन स्वतंत्र गट निर्माण होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या संभ्रमाच्या स्थितीमध्ये ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ ही म्हणण्याची वेळ आलेले नगरसेवक कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्षविरोधी कोण? :
गटातटांच्या राजकारणात पक्षांतर्गत राजकारण अंतिम टोकाला गेले असून, कोण कोणावर कारवाई करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणारे आहे. पक्षाचे आदेश पाळायचे की नेतृत्वाचे, हा कठीण प्रसंग नगरसेवकांसमोर येणार आहे. गटामधून सुनील काळेंसह तीन नगरसेवकांना निष्कासित करण्याची कारवाई होते किंवा गटनेते पदावरून मार्डीकर यांच्यावर पायउतार होण्याची वेळ येणार, हे आगामी काळच ठरवणार आहे. मात्र, कोणतीही कारवाई झाल्यास निर्णय देताना यंत्रणेची कसोटी लागणार आहे.