आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती शहरात होणार जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - क्रीडानगरी असा नावलौकिक मिळवणाऱ्या अंबानगरीत यंदाच्या क्रीडा मोसमात जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना होणार असून, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य, मॅट अन् इतर आवश्यक सुविधांच्या जुळवणीसाठी राज्य शासनाकडून ७० लाखांचा निधी मंजूर झाला अाहे. हा निधी टप्प्याटप्प्याने अन् कामाच्या प्रगतीनुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला राज्य क्रीडा आयुक्तालय, पुणे याजकडून प्राप्त होईल.

दरम्यान, शहरातील मैदानांची दुरवस्था आणि क्रीडा साहित्याअभावी खेळाडूंची होणारी गैरसोय यासंबंधीचे सचित्र वृत्त दै. ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित करून जिल्हा क्रीडा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर हा निधी मंजूर झाल्याने आता जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेसोबतच दर्जेदार साहित्य मिळणार असल्याने अमरावती शहरासह जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

डीपीटीसी अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. यामुळे जिल्ह्याच्या क्रीडा विकासाला २०१५-१६ च्या मोसमात चालना मिळणार आहे.विशेष बाब अशी, की प्रथमच १३ खेळांच्या केवळ साहित्य खरेदीसाठी एवढ्या माेठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना येथेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळतील.

या खेळांमध्ये ज्युदो, कुस्ती, जलतरण, भारोत्तोलन, साॅफ्टबाॅल, क्रिकेट, धनुर्विद्या रिकर्व्ह राउंड, धनुर्विद्या इंडियन राउंड, रायफल शूटिंग, हँडबाॅल, बास्केटबाॅल, खो-खाे कबड्डी, व्हाॅलिबाॅल आणि फुटबाॅलचा समावेश असून, सर्वाधिक रक्कम ही कुस्ती आणि त्यानंतर ज्युदो, धनुर्विद्या, रायफल शूटिंग असा क्रम लागतो. रिकर्व्ह धनुर्विद्या प्रकारासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी नऊ लाखांच्या वर आणि रायफल शूटिंगसाठी आठ लाखांच्या वर रक्कम खर्च केली जाईल.
अमरावतीत राज्य धनुर्विद्या प्रबोधिनी असून, येथील धनुर्धर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये धडाकेबाज कामगिरी करीत आहे. त्यामुळे केवळ रिकर्व्हच नव्हे, तर इंडियन राउंडसाठीही बऱ्यापैकी रक्कम खर्च केली जाणार आहे. यानंतर रायफल शूटिंग या खेळाचा क्रमांक येतो. अमरावतीतच काय पण, विदर्भात या खेळाचा अद्याप हवा तसा विकास होऊ शकला नाही. ही बाब लक्षात घेऊन साहित्य खरेदीसाठी आठ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. सध्या विभागीय क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे दहा मी. शूटिंग रेंज उपलब्ध आहे.

अमरावती जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळावे म्हणून डीपीटीसी अंतर्गत दरवर्षीच हा निधी मिळणार आहे. यामुळे निश्चतपणे येथील खेळाडू खेळाचा विकास होणार आहे. ही क्रीडानगरी असून, येथील क्रीडा प्रतिभांची भरारी बघता त्यांचे कौशल्य वाढावे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याचाच हा एक भाग आहे. किरण गित्ते, जिल्हाधिकारी, अमरावती.

शासनाने सर्वाधिक २० लाखांच्या वर रक्कम ही कुस्तीसाठी मंजूर केली आहे. याअंतर्गत १२ गुणिले १२ मी.ची कुस्ती मॅट सिंथेटिक कव्हरसह मिळणार आहे. फिलाद्वारे मान्यताप्राप्त स्वित्झर्लंड येथील जम्प कंपनीद्वारे निर्मित या मॅटची किंमत १६,२६,१८८ रु. आहे. तसेच युरोपातून ही मॅट भारतात पोहोचण्यास काही महिन्यांचा कालावधी लागतो. याशिवाय इतर साहित्यही खरेदी केले जाईल.
ज्युदो या खेळासाठी दहा लाखांच्या वर निधीची तरतूद असून, १८ गुणिले १८ जाडीची अन् गुणिले मी. ६० मि. मी. जाडीची ही मॅट ९,९९,००० रुपयांची असून ती फ्रान्सच्या एच. के. स्पोर्ट्स कंपनीकडून खरेदी करावी लागते. ती भारतात येण्यास काही महिने लागतात.
बातम्या आणखी आहेत...