आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती शहरात लवकरच साकारणार आणखी एक खुले कारागृह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - कारागृहांच्या भिंतीआड शिक्षा भोगत असलेल्या, पण वर्तणूक चांगली असलेल्या निवडक बंदीजनांसाठी राज्यात पाच नवी खुली कारागृहे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यापैकी एक अमरावतीत लवकरच अस्तित्वात येणार असून प्रक्रियेने वेग घेतला आहे. सध्या जिल्ह्यात मोर्शी येथे एकमेव खुले कारागृह आहे.

खुल्या कारागृहात बंदी पूर्णत: मोकळे असतात. येथे शेती फुलवून त्यांना शिक्षा भोगायची असते. राज्यात सध्या मोर्शीसह पैठण, आटपाटी (सांगली), येरवडा (पुणे) या ठिकाणी खुले कारागृह आहे. अमरावती येथील खुले कारागृह शहरातील मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात उभारण्यात येईल. येथील अडीच हेक्टर क्षेत्रात खुल्या कारागृहाची शेती राहणार आहे. याच शेतीत राबून बंदी आपली शिक्षा पूर्ण करतील. खुल्या कारागृहासाठी निवड केलेल्या 50 बंदींची यादी मान्यतेसाठी स्थानिक कारागृह प्रशासनाने तुरुंग उपमहानिरीक्षक कार्यालयाकडे पाठवली आहे. पुढील महिन्यात या यादीला मान्यता मिळून खुले कारागृह सुरू होण्याची शक्यता आहे.

शिक्षेमध्ये दुप्पट माफी
प्रस्तावित खुल्या कारागृहाची क्षमता 50 बंदींची आहे. बंद कारागृहात सभ्य वर्तणूक व शिक्षेचे फार थोडे दिवस शिल्लक राहिलेल्या बंदींना खुल्या कारागृहात राहण्याची मुभा मिळणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या अमरावती कारागृहातील बंदींसाठी बॅरेकपैकी क्रमांक 11 चे बॅरेक खुल्या कारागृहात आरक्षित राहणार असल्याची माहिती कारागृह अधीक्षक शरद खटावकर यांनी दिली.