आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Plan For Belora Airport Amaravati Said Mahesh Sharma

बेलोरा विमानतळासाठी पुन्हा तयार करणार नवीन आराखडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी पुन्हा एकदा नव्याने आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे केन्द्रीय नागरी विमान उड्डयण राज्यमंत्री महेश शर्मा यांनी गुरूवारी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत जाहीर केले.
बेलोरा विमानतळाचा विस्तार करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही हे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे मत असले तरी अमरावती पश्चिम विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी विस्तारीकरण गरजेचे आहे आणि ते केले पाहिजे अशी भूमिका केन्द्रीय रस्ते,परिवहन जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी बैठकीत घेतली. त्यावर, केंद्रीय राज्यमंत्री महेश शर्मा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
अमरावती शहर आणि विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी बडनेरा स्थित बेलोरा विमानतळाचा विकास करण्याच्या दृष्टीने नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी(दि.२३) नवी दिल्ली येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

या बैठकीला केंद्रीय नागरी उड्डयण खात्याचे राज्यमंत्री महेश शर्मा, महाराष्ट्राचे उद्योग राज्यमंत्री तथा अमरावतीचे पालक मंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, जिल्हाधिकारी किरण गित्ते, अमरावतीचे आमदार डाॅ. सुनील देशमुख, बडनेराचे आमदार रवि राणा,मोर्शीचे अामदार डाॅ. अनिल बोंडे, दर्यापूरचे आमदार रमेश बुंदिले, धारणीचे प्रभुदास भिलावेकर, चांदूररेल्वेचे आमदार वीरेंद्र जगताप, तिवसाचे आमदार अॅड.यशोमती ठाकूर, अचलपूरचे आमदार बच्चू कडू उपस्थित होते. यावेळी बेलोरा विमानतळाचा पुन्हा एकदा नव्याने अभ्यास करण्याचा निर्णय राज्यमंत्री महेश शर्मा यांनी घोषित केला.

करारनामे अद्याप झाले नाही

जळगाव खान्देशच्या धर्तीवर बेलोरा विमानतळाचा विकास करण्यासंदर्भात फेब्रवारी २०१४ मध्ये महाराष्ट्र सरकारने जीआर काढला. त्यानुसार महाराष्ट्र शासन ४११ हेक्टर भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाला ६० वर्षे कालावधीच्या लीजवर उपलब्ध करून देण्याचे मान्य केले होते. त्याचप्रमाणे काही महत्वाच्या सवलतीही देण्याचे मान्य केले होते.

परंतु या संदर्भातले करारनामे अजूनही झालेले नाही, हा मुद्दाही गुरुवारच्या बैठकीत चर्चेला आला होता. भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने कन्सल्टट नेमून विमानतळ विस्तारीकरणाची फिजीबिलीटी तपासली होती. त्यात आर्थिकदृष्ट्या हा विस्तार परवडणारा नसल्याचा निष्कर्ष समोर आला होता. मात्र, फिजीबिलीटीची अट रद्द करून विस्तारीकरणाचे काम करावे, अशी विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

एनटीसीच्या गिरण्यांसाठी ना हरकत प्रमाणपत्र

मुंबईतील बंद कापड गिरण्यांबाबतही बैठकीत व्यापक विचारविमर्श करण्यात आला. मुंबईतील एनटीसीच्या कापड गिरण्या बंद आहेत आणि चालू आहेत. या गिरण्या विदर्भात आणण्याचा दृष्टीने श्रम मंत्रालयाकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळवण्याची आवश्यकता असून त्या दृष्टीने राज्य वस्त्रोद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त प्रधान सचिव सुनील पोरवाल यांनी त्याबाबत काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.
विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत आणि कापूस उत्पादकांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे या प्रामाणिक हेतूने गुरुवारी आयोजित केलेल्या उच्चस्तरीय बैठकीत दिलासादायक चर्चा झाली.

अमरावती-जळगाव-मुंबई विमानसेवा

अमरावतीहून जळगाव मार्गे मुंबईसाठी छोटे विमान सुरु करण्याची तयारी एअर इंडियाने दर्शवली आहे. तसे झाल्यास अमरावती आणि पश्चिम विदर्भाच्या विकासाला चालना मिळू शकते.

डीपीआरचेकाम निट्राकडे

अचलपूरच्या फिनले मिलच्या विस्तारीकरण करण्याचा निर्णय गुरूवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मिलचा विस्तार करण्याच्या दृष्टीने डीपीआर बनविण्याचे काम निट्रा या संस्थेकडे सोपविण्यात आले असून, ३१ मे पर्यंत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे . सध्या या मिलमध्ये ४५ हजार स्पिंडल्स तयार करण्यात येतात, विस्तार झाल्यानंतर ७० हजार स्पिंडल्स तयार होतील. येत्या एक वर्षात हा विस्तार करण्यात येणार आहे.
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत गुरूवारी नवी दिल्ली येथे एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री संतोष गंगवार आणि लघु मध्यम उद्योग राज्य मंत्री गिरीराज सिंघ हे या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते .