आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Tax In Electricity Bill People Agressive In Amaravati

वीज ग्राहकांना आणखी एका कराचा ‘शॉक’, ‘अतिरिक्त आकार’ने वाढवले टेन्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वीजबिलाचा भुलभुलय्या वाढवत नेणाऱ्या महावितरणने ग्राहकांच्या शिरावर आणखी एक कर लादला आहे. ‘अतिरिक्त आकार’ हे या कराचे नाव असून, त्यामुळे वीज ग्राहकांचे बजेटच कोलमडले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून ग्राहकांच्या बिलांमध्ये हा कर लिहून येत आहे. प्रारंभी चुकून एखादा कॉलम वाढला असावा, असे म्हणत ग्राहकांनी एक महिना तो सहन केला. मात्र, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या जानेवारी महिन्याच्या बिलातही त्याची पुनरावृत्ती झाल्यामुळे ग्राहकांनी त्याविरुद्ध आवाज उठवला आहे.
विजेचे बिल हे कायम भुलभुलय्या बनले आहे. विजेच्या आकारासह त्यात विविध पंधरा शीर्ष आहेत. त्यामुळे महावितरण कशा-कशाचा आकार घेते आणि का घेते, याचा उलगडाच होत नाही. ग्राहकांनी अनेकदा ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला. मात्र, त्यासंदर्भातील समाधानकारक खुलासा कधीही प्राप्त होत नाही, असा सार्वत्रिक सूर आहे.

‘अतिरिक्त आकार’ हा नवा कर लावण्यापूर्वी महावितरणने एलबीटीची (स्थानिक संस्था कर) वसुली सुरू केली. ती वैधानिक की गैर, यावर बराच गहजब झाला. शेवटी ‘पालिकेने तो कर मागितला म्हणून आम्ही ग्राहकांवर लावला,’ असे म्हणत संबंधित यंत्रणेने हात झटकले. त्यामुळे नागरिकांनी आपला मोर्चा पालिकेकडे वळवला आहे.

दरम्यान, ती बाब विस्मृतीत जात नाही तोच आता अतिरिक्त आकार पुढे आला आहे. वीज बिलातील एकूण करांच्या श्रुंखलेत हे पंधरावे शुल्क आहे. त्यामुळे वीज ग्राहक कंटाळले असून, अशा पद्धतीची वसुली थांबवावी, अशी त्यांची मागणी आहे.

नव्या कराबाबत फेरविचार करावा

^वीज बिलाच्या नावाखाली ग्राहकांकडून आधीच वेगवेगळ्या रकमा घेतल्या जातात. त्यात आणखी एका कराची भर पडल्यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. शासनाने याबाबत फेरविचार करावा. श्रीकृष्ण माहोरे, अध्यक्ष, उपेक्षित महासंघ.

असा आहे वीज बिलाचा भुलभुलय्या

वीजिबलात विविध पंधरा प्रकारचे शुल्क लिहिले आहेत. त्यामध्ये स्थिर आकार, वीज आकार, वीज शुल्क, इंधन समायोजन आकार, एलबीटी, वीज विक्री कर, वजा सरासरी देयकाची रक्कम, व्याज, इतर आकार, अतिरिक्त आकार, निव्वळ समायोजित थकबाकी/जमा, समायोजित रक्कम, व्याजाची थकबाकी, एकूण थकबाकी/जमा, सुरक्षा ठेव जमा, विलंब आकार आदी शीर्षांचा समावेश आहे. याशिवाय बिलाची रक्कम पाच रुपयाच्या आत-बाहेर असल्यास पूर्णांक देयकाच्या नावाखाली थेट पाच-सात रुपये वाढवले जातात, ते वेगळेच.

ग्राहकांच्या रागात आणखी पडली भर

महावितरण कंपनीचे बिल हे अत्यंत गुंतागुंतीचे आहे. त्यातील बहुतेक शब्द सारखे असूनही त्याच-त्या नावाने वेगवेगळ्या रकमांचा उल्लेख केलेला आहे. एका ठिकाणी ‘आकार’ तर दुसऱ्या ठिकाणी त्याच शब्दाशी समानार्थी असलेला ‘शुल्क’ हा शब्द वापरला आहे. त्यामुळे ग्राहक महावितरणच्या नावाने खडे फोडत असून, त्यांच्या रागात ‘अतिरिक्त आकार’ या नव्या कराने आणखी भर घातली आहे.
सबसिडी नाकारल्यामुळे ग्राहकांवर वाढला भार

जो आकार बिलात उमटला आहे, ती रक्कम आधी शासनातर्फे सबसिडी म्हणून दिली जायची. परंतु राज्य शासनात झालेल्या बदलानंतर नोव्हेंबर महिन्यापासून ही सबसिडी बंद करण्यात आली आहे. परिणामी, महावितरणने ग्राहकांकडून वसुली सुरू केली आहे. वाणिज्यिक वापर करणाऱ्या उद्योजकांसाठी एक महिना उशिरा हा निर्णय लागू करण्यात आला. त्यामुळे त्यांच्याकडून डिसेंबरपासून वसुली सुरू आहे.

नियमानुसारच वसुली

^.बिलामध्ये उल्लेखित रक्कम आधी शासनातर्फे दिली जायची. नोव्हेंबरपासून नियम बदलला. वाणिज्यिक वापर करणाऱ्यांसाठी एक महिना एक्स्टेंशन देण्यात आले. त्यामुळे डिसेंबरपासून हा कर वसूल केला जात आहे. दिलीप घुगल, अधीक्षक अभियंता
फोटो - वीज बिलामध्ये लागू झालेला हाच तो आणखी एक कर (वलयांकित केलेला)