आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्षित अंबाडीपासून तयार केला आरोग्यवर्धक चहा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - शेताच्या धुर्‍यावर उगवणारा आणि सर्वांच्या दुर्लक्षित असणारे पीक म्हणजे अंबाडी. अंबाडीपासूनही अर्थप्राप्ती होऊ शकते, याचा विचारही शेतकर्‍यांच्या मनाला शिवत नाही. परंतु, हीच अंबाडी मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी त्यापासून तयार करण्यात येणारा चहा आरोग्यवर्धक असल्याचा साक्षात्कार नागपुरात सुरू असलेल्या ‘अँग्रोव्हिजन‘ कृषी प्रदर्शनात झाला. शेतीच्या दृष्टीने अंबाडी हे अर्थप्राप्तीचे बोनस पीक असल्याची शुभवार्ता समोर आली आहे.

अंबाडीपासून आरोग्यवर्धक चहा निर्माण करण्याचा देशातील पहिला प्रयोग नागपुरात राबवण्यात येत आहे. बी.कॉम.पर्यंत शिक्षण झालेले माजी सैनिक संजय देशपांडे यांनी अंबाडीची उपयोगिता ओळखली आणि अंबाडीपासून चहा तयार करण्याचा प्रकल्प उभारला. ‘न्युट्रास्मार्ट हर्बल रेड टी’ असे त्यांनी अंबाडीपासून तयार केलेल्या चहाचे नाव आहे. पारंपरिक चहाला फाटा देणार्‍या कॅफेनमुक्त ‘रेड टी’ला विदेशात अंबाडीच्या चहाला मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. पश्चिमी देशात या चहाला ‘हेल्थ टी’ असे नाव असल्याची माहिती आहे.

भारतात अंबाडी हे शेताच्या धुर्‍यांवर क्वचितच दिसते. अंबाडीची ओळख ही चटणी आणि भाजी एवढीच र्मयादित आहे. परंतु, याच अंबाडीला येणार्‍या लाल रंगाच्या फुलांमध्ये औषधी गुणद्रव्ये आहेत. या फुलपाकळ्यांवर प्रक्रिया करून तयार करण्यात आलेल्या चहा उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, मधुमेह, मूत्र आदी जीवघेण्या आजारांवर गुणकारी आहे.

‘रेड टी’ला पसंती
अंबाडीत व्हिटॅमिन सी आणि आयर्न असते. थंड आणि गरम अशा कोणत्याही फॉर्ममध्ये हा चहा आरोग्यास गुणकारी ठरणार आहे. आगामी काळात आता अंबाडीपासून जाम, सरबत, चटणी आणि सॉसही तयार करून प्रक्रिया उद्योगाला चालना देणे शक्य होणार आहे. छत्तीसगड सरकारने अंबाडीला राजार्शय देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही देशपांडे म्हणाले. रेशीमबाग मैदानावरील राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात उघडण्यात आलेल्या रेड टीच्या स्टॉलने सर्वांचे लक्ष वेधले असून, नागरिकांनीही चहाला पसंती दर्शवली आहे.

एकरी 20 हजार
शेतकर्‍यांनी अंबाडीच्या पिकाकडे लक्ष दिल्यास त्यांना मोठय़ा प्रमाणात पैसा मिळू शकतो. पारंपरिक चहाला फाटा देणार्‍या कॅफेनमुक्त रेड टीच्या निर्मितीकरिता अंबाडीचे फूल 200 रुपये प्रती किलो विकत घेण्यात येतात. छत्तीसगड आणि विदर्भातील काही भागांतच अंबाडीचे उत्पादन करण्यात येते. वाढती मागणी लक्षात घेता अंबाडीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना 20 ते 25 हजार रुपयांचे बोनस मिळवता येईल, अशी माहिती देशपांडे यांनी दिली.