आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी छत्रसालनगरमध्ये नालीत आढळले नवजात अर्भक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरात सोमवारी रात्री एक्सप्रेस हायवेला लागून निर्मणूष्य ठिकाणी चार दिवसांची चिमुकली आढळली होती. तिच्या आई-वडिलांचा शोध अजूनही लागला नसताना मंगळवारी सकाळी छत्रसालनगरमध्ये एक नवजात अर्भक आढळल्याने अमरावतीकर सुन्न झाले आहे. गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील छत्रसालनगरमध्ये एका नालीत हे अर्भक आढळले. प्रकरणाची माहिती होताच पोलिसांनी ते ताब्यात घेऊन अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हे अर्भक कुणी टाकले, याचा पोलिसांना वृत्त लिहिस्तोवर पत्ता लागलेला नव्हता. पोलिसांनी वेगाने तपासचक्र चालवले असून गर्भपात करुन ते टाकण्यात आले काय, याचा शोध पोलिस घेत आहेत. अशाप्रकारे नालीत अर्भक टाकण्यात आल्यामुळे हे प्रकरण संशयास्पद असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
सोमवारी आढळलेल्या चिमुकलीचे गुढ कायम
दुसरीकडे सोमवारी रात्री एक्सप्रेस हायवेला लागून जंगलातील झुडपात चार दिवसांची बालिका टाकणार्‍याचा पोलिस शोध घेत आहेत. शॉलमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळलेल्या या चार दिवसीय बालिकेला गाडगेनगर पोलिसांनी सोमवारीच डफरीन रुग्णालयात दाखल केले होते. दत्तविहार कॉलमीमधील श्याम दामोधर आडे (33) हे रात्रीचे घराकडे निघाले असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या निर्जन परिसरातून त्यांना लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला होता. त्यांनी परिसरातील नागरिकांना बोलावले. पाहणी केली असता चिमुकली बालिका असल्याचे त्यांना आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली होती. गाडगेनगर ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल चव्हाण घटनास्थळी पथकासह पोहचले व त्यांनी चिमुकलीला जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर ही चिमुकली चार ते पाच दिवसांची असून तिची प्रकृती व्यवस्थित असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले होते.
दरम्यान, चार दिवसीय चिमुकलीला अशाप्रकारे का व कुणी टाकून दिले, हा गुंताही पोलिसांना सोडवायचा आहे. चिमुकल्या बालिकेला जंगलात टाकून दिल्यानंतर दुसर्‍याच दिवशी अर्भक सापडल्यामुळे नागरिकांवर आपल्या पुरोगामीत्वाचा नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असे मत व्यक्त केल्या जात आहे. स्त्री-पुरुष समानता आणि लिंगभेदाबद्दलची जाणीव नव्याने जागवण्याची वेळ आल्याचे मत सजासशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. या दोन संवेदनशील घटनांमुळे पोलिसांसमोर कडवे आव्हान निर्माण झाले आहे. या दोन्ही प्रकरणाचा गुंता सोडवण्यासाठी पोलिसांचा कस लागणार आहे.
गुन्हा दाखल, शोध सुरू
सोमवारी रात्री चार दिवसांची चिमुकली बेवारस स्थितीत आढळली होती. तसेच मंगळवारी सकाळी नवजात अर्भक आढळून आले आहे. हा प्रकार गंभीर असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनांमागील व्यक्तींचा शोध पोलिस घेत आहेत. शिरीष राठोड,ठाणेदार गाडगेनगर.
उपभोग संस्कृतीचा परिणाम
समाजामध्ये वाढत असलेल्या उपभोग संस्कृतीचा हा परिणाम आहे. पाल्यांवर संस्कार करण्यासाठी पालक कमी पडत आहेत. भोगविलास संस्कृती, प्रसिद्धीमाध्यमं यामुळे समाजात एकप्रकारचा बिनधास्तपणा आला आहे. कायद्याची भिती कोणालाही उरली नाही. यासोबतच सामाजिक बांधिलकी कमी होत आहे. सामाजिक व कौंटूबिक पातळीवर मुल्यांचे शिक्षण देणे गरजेचे झाले आहे. प्रा. दिलीप काळे, समाजशास्त्र. सोमवारी रात्री निर्जन परिसरात अवघ्या तीन-चार दिवसांची चिमुकली बेवारस अवस्थेत आढळल्याच्या धक्क्यातून अमरावतीकर सावरत नाहीत, तोच मंगळवारी सकाळी छत्रसालनगरमध्ये एका नालीत नवजात अर्भक आढळल्याच्या घटनेने संवेदनाच बोथट करून टाकल्या. आधुनिक, पुरोगामी शहरातही असल्या घटना घडू शकतात, यावर अनेकांचा विश्वासच बसत नाहीये. मात्र, हे वास्तव आहे.