अमरावती- अमरावती जिल्ह्यातील गुणी कर्तबगार खेळाडूंच्या अंगी असलेल्या क्रीडा प्रतिभांना योग्य आयाम देण्यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण अर्थात स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडिया (साई)ने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे मेळघाटसह संपूर्ण अमरावती जिल्ह्यातून धनुर्विद्या, कुस्ती, जिम्नॅस्टिक्स, अॅथलिटेक्स आणि जलतरण या खेळासाठी देशाला २०२० आणि २०२४ च्या ऑलिम्पिकसाठी मोठया प्रमाणात खेळाडू मिळतील,असा आशावाद नुकत्याच जिल्हा दौऱ्यावर आलेल्या भारतीय क्रीडा प्राधिकरण महाराष्ट्रच्या संचालिका सुष्मिता आर.ज्योतिषी भाजप क्रीडा सेलच्या प्रदेश समन्वयिका राणी द्विवेदी यांनी व्यक्त केला आहे.
देशात एचव्हीपीएमच्या माध्यमातून क्रीडा चळवळीला सर्वप्रथम येथूनच सुरुवात झाली .अमरावती जिल्ह्यातील क्रीडा प्रतिभांबाबत आजवर भारतीय क्रीडा प्राधिकरणाला फारशी माहिती नव्हती. मात्र भारतीय धनुर्विद्या महासंघाचे सह-सचिव प्रमोद चांदुरकर यांनी त्यांना याबाबत अवगत केले. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष दौरा करून येथील क्रीडा सुविधा प्रतिभांबाबत माहिती जाणून घेतली. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी एचव्हीपीएमचाही दौरा केला. त्यानंतर येथे ‘साई’ची डे बोर्डिंग योजना सुरू करण्याची तयारीही दर्शवली.
मेळघाट या आदिवासी भागातील बहुतांश प्रतिभावान खेळाडू हे अमरावतीत येऊन कारकीर्द घडवत असतात. मात्र दर्जेदार क्रीडा साहित्य आणि उमद्या प्रशिक्षकांच्या अभावामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचता येत नाही. ही उणीव जर भरून काढायची असेल तर अमरावतीत ‘साई’चे केंद्र स्थापन करावेच लागेल. खेळाडूंना उत्तम क्रीडा साहित्य, आहार आणि दर्जेदार प्रशिक्षण द्यावे लागेल यावर दोन्ही पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे.
ऑलिम्पिकची आतापासून तयारी
देशात सध्या २०२० २०२४ च्या ऑलिम्पिकची तयारी सुरू झाली असून आतापासूनच जर अमरावती मेळघाटसारख्या ठिकाणावरील प्रतिभावान खेळाडू शोधून त्यांच्या कौशल्याला पैलू पाडले तर त्यांची जागतिक दर्जाच्या स्पर्धेसाठी तयारी करून घेता येईल. देशाच्या पदक तालिकेत पदकांची भर पडेल, असे ‘साई’ला वाटत असल्यामुळे त्यांनी अमरावतीकडे लक्षकेंद्रीत केले आहे.
अंबानगरीने दिले देशाला अनेक खेळाडू
अंबानगरीने राज्य देशाला आजवर अनेक राष्ट्रीय खेळाडू दिले आहेत. धनुर्विद्या, जिम्नॅस्टिक्स, जलतरण, अॅथलेटिक्स आणि कुस्ती या खेळात अमरावतीच्या खेळाडूंनी लक्षवेधक कामगिरी केली आहे. या खेळात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे खेळाडू.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, निवडक खेळाडूंसाठी सराव केंद्राची स्थापना....