आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जून महिन्यात जिल्ह्यात 9 शेतक-यांची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - पाऊस, पेरण्याचा हंगाम असलेल्या जून महिन्यात जिल्ह्यात 9 शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले. गतवर्षीची नैसर्गिक आपत्ती, कर्जवसुलीचा तगादा, कर्जाचे पुनर्गठन न होणे, नापिकी, सिंचन व आरोग्याचे प्रश्न, बियाणे टंचाई, महागाई, भारनियमन, शेतमालाला भाव नाही आदी कारणांमुळे आत्महत्या झाल्याचे निदर्शनास आले आहे. निवडणुकीच्या राजकारणात रंगलेले लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या संवेदन शून्यतेमुळे आत्महत्या होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.

शेतक-यांवर दुबार पेरणीचे सावट आल्याने शेतकरी सलग दुस-या वर्षी चिंतेत आहेत. या वर्षीच्या सहा महिन्यांत विदर्भातच नव्हे, देशात सर्वाधिक 94 शेतक-यांच्या आत्महत्या झालेला जिल्हा म्हणून हिणवला जात आहे. जिल्ह्यात 2000 पासून चार हजारांवर शेतक-यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचे दुर्दैव आहे. शासन दरबारी मात्र तीन हजार शेतक-यांच्या नोंदी असून, त्यापैकी नुकसानभरपाईसाठी मात्र केवळ 1017 आत्महत्या पात्र ठरल्या आहेत. कृषिप्रधान संस्कृती म्हणवणा-या देशातील शेती व शेतक-यांच्या समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनातील शेतक-यांनी व्यक्त केली. राज्यात प्रत्येक राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाच्या शेतकरी आघाड्या आहेत. शेतक-यांची एकही समस्या दूर झाली नाही.

शेतकरी उपेक्षित
- निवडणुकीदरम्यान मतांसाठी फिरताना नेत्यांकडून केवळ घोषणाबाजी होते. कार्यवाही होत नाही. शेतमालविक्रीची साधी बाजारव्यवस्था आजपर्यंत विकसित होऊ शकली नाही. शेतकरी संघटित होण्याची गरज आहे. शासन यंत्रणेकडून शेतकरी उपेक्षित ठरल्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. ’’ विजय कदम, संयोजक, विदर्भ शेतकरी विकास परिषद, यवतमाळ.
नैसर्गिक आपत्तीचे 101 बळी : गतवर्षी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीत, पुरामध्ये वाहून तसेच वीज कोसळून 41 जणांचा बळी गेला.सर्पदंश, वन्यजीव हल्ला, अपघात या घटनांमध्ये 101 नागरिक मृत्युमुखी पडले. हे ढिसाळ कृषी व्यवस्थेचे बळी ठरलेत.

जून महिन्यातील शेतकरी आत्महत्या
०मारुती रामदास कुळसंगे, डोंगरखर्डा, कळंब (1 जून)
०सरस्वती मारुती कुळसंगे, डोंगरखर्डा, कळंब, (1 जून)
०सुभाष राजाराम कुबडे, मरसूळ, उमरखेड (3 जून)
०गणेश रामचंद्र चौधरी, शहापूर, नेर (4 जून)
०श्यामराव लक्ष्मण आडे, जोडमोहा, कळंब, (5 जून)
०रमेश गुलाबराव दिघडे, परसोडी, कळंब, (17 जून)
०अमरसिंग गुलाब राठोड, शेंदरी, नेर, (21 जून)
०संजय प्रल्हाद काळे, सावरगाव, नेर, (24 जून)
०सुरेश रामदास दिघडे, परसोडी, नेर, (26 जून)