आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Banagude Patil, Latest News In Divya Marathi

मराठी बाणा जपण्यासाठी शिवशाहीची नितांत गरज, नितीन बानगुडे पाटील यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मुंबईतील महत्त्वपूर्ण कार्यालये गुजरातमध्ये हलवून ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा,' अशा प्रकारची जाहिरातबाजी करून महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचण्याचा भाजपचा प्रयत्न योग्य नाही. महाराष्ट्र आमच्या हृदयात असून, मराठी बाणा जपण्यासाठी शिवशाहीची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी बुधवारी केले.
शिवसेनेचे अमरावती मतदारसांघातील उमेदवार प्रदीप बाजड यांच्या प्रचारार्थ विमलाबाई देशमुख सभागृहातील मेळाव्यात ते बोलत होते. दहशतवाद्यांचा धोका मुंबईला असताना येथील नौदलाचे प्रशिक्षण केंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला हलवले. आरबीआयचे मुख्य कार्यालयदेखील गुजरातला नेण्याचा डाव आखला जात आहे. शिवाय केंद्र शासनाच्या तिजोरीत ४० टक्के महसूल देणाऱ्या मुंबई शहराला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रयत्न होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अशाप्रकारे महाराष्ट्र लुटला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या लुटीला विरोध केल्याने भाजपला शिवसेनेसोबत युती नको होती, ही अस्मिता जपण्याचे काम शिवसेनेने केले. छत्रपती शिवाजी महाराजदेखील दिल्लीच्या शहंशहासमोर कधी झुकले नाहीत.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरातबाजीचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. काँग्रेस राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून ‘महाराष्ट्र पुढे’ ही जाहिरात दिली जात आहे. मागील १५ वर्षांत ५४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार वाढले असताना ही जाहिरातबाजी म्हणजे जनतेच्या डोळ्यांत धूळफेक असल्याचे ते म्हणाले. या वेळी खासदार आनंदराव अडसूळ, अनिल चव्हाण, विष्णू तांडेल, प्रदीप बाजड, प्रा. प्रशांत वानखडे उपस्थित होते.
शिवसेनेच्या मेळाव्यात उपस्थितांना प्रा. नितीन बानगुडे यांनी मार्गदर्शन केले.