आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवावर सरकारवर अवलंबून राहू नका, कृषी विकास प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी गडकरींचा सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - परमेश्वर सरकारवर विश्वास ठेवला, तर विकास होणार नाही. त्यामुळे स्वत:चा विकास स्वत:च साधावा लागणार आहे. शेतीचा विकास करण्यासाठी तंत्रज्ञान आत्मसात करून इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.
संकटे खूप आहेत; परंतु या लहानलहान संकटांची गावपातळीवरच सोडवणूक करून मोठे प्रश्न सुटणार आहेत. नवनवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशानेच या कृषिप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन केंदीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (दि. १०) केले.
कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने सायन्सकोर मैदानावर आयोजित कृषी विकास प्रदर्शनाचे उद््घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी, खासदार आनंदराव अडसूळ, खासदार अविनाश पांडे, पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉ. सुनील देशमुख, कृषी शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. मायी, आमदार डॉ. अनिल बोंडे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारींसह अधिकारी मान्यवर उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, स्थिती गंभीर आहे. संकटे अनेक आहेत; परंतु स्थानिक पातळीवरील लहानलहान संकटांवर मात करून मोठ्या संकटांना तोंड देणे शक्य आहे. यासाठी गावपातळीवरून स्वत:पासून सुरुवात होणे गरजेचे आहे. स्वत:च्या प्रयोगातून यश मिळवणाऱ्या शेतकऱ्यांच्या ज्ञानातूनच शेतीचा विकास शक्य आहे. शेती व्यवसायात नवीन तंत्रज्ञान पटवून देणे; तसेच या तंत्रज्ञानाचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी कसा करता येईल, हे पाहणे आवश्यक आहे. प्रश्न अनेक आहेत. या छोट्या-छोट्या प्रश्नांचे उत्तरही आपल्यालाच शोधायची आहेत. सरकार त्यासाठी फक्त आधार देऊ शकते.
विदर्भातील कृषी समस्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी विक्रेता खरेदीदार यामध्ये समन्वय साधणे आवश्यक आहे. यासाठी तळागाळातील लहान लहान बाबी बदलण्याची आवश्यकता आहे. या कृषी व्यवसायासमोर असलेल्या संकटांतून मार्ग काढण्यासाठी तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे झाल्याचे ते म्हणाले. खासदार अडसूळ म्हणाले, की गडकरी यांनी शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी पुढाकार घेऊन उद्योगांसोबत सिंचनाच्या सोयीकडे लक्ष द्यावे. खासदार पांडे म्हणाले, शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. डॉ. मायी यांनी शेतकऱ्यांना दरमहा वेतन देण्याची गरज व्यक्त केली. गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक, तर सोमेश्वर पुसतकर यांनी संचालन केले.

कार्यक्रम तीन तास उशिरा

कृषी प्रदर्शनाच्या उद््घाटन कार्यक्रमाचे आयोजन साडेचार वाजता करण्यात आले होते. परंतु कार्यक्रम तब्बल तीन तास उशिरा झाल्याने बहुतांश शेकऱ्यांचा हिरमोड झाला.

... अन‌् पिकवला हशा

विदर्भातील प्रशासकीय यंत्रणेची खिल्ली उडवताना गडकरी यांनी अनुभवातून धापेवाडा येथील घरच्या जनावरांचे मार्मिक उदाहरण दिले. गाय काढायला आली, त्यावेळेस ३० ते ४० किलोमीटर अंतरावरून पशुचिकित्सक यायचा. परंतु तो येण्यासाठी लागणाऱ्या कालावधीत गायीचा वेळ निघून जायचा. त्यामुळे गाय फळवूनही निरुपयोग व्हायची.
अनेक वेळा पशुचिकित्सक वेळेत पोहोचू शकत नसल्यामुळे गाय फळवल्याच जात नव्हती. त्यामुळे घरच्या बहुतांश गायी-म्हशी वेळेवर फळत नसल्याने निरुपयोगी ठरल्या होत्या. त्यामुळे कृषीसाठी आवश्यक तंत्रज्ञान तातडीने उपलब्ध होण्याची गरज आहे. ती पूर्ण होऊ शकत नसल्यामुळेही कृषी विकासावर मोठा परिणाम झाल्याचे ते म्हणाले. या उदाहरणामुळे प्रेक्षक व्यासपीठावर मोठा हशा पिकला.

पावसाचा खोळंबा

सायंकाळी दोन वेळा पावसाची सुरुवात झाल्यामुळे आयोजकांची त्रेधातिरपिट उडाली. साडेचार वाजता बहुसंख्य शेतकरी मोकळ्या मैदानात उभारलेल्या व्यासपीठासमोर येण्यास सुरुवात झाली. परंतु पाच वाजताच्या सुमारास पावसाने सुरुवात केल्यानंतर उपस्थित प्रेक्षक उठून गेले. आयोजकांनी व्यासपीठावरील खुर्च्यांशेजारी असलेल्या डोममध्ये हलवण्यास सुरुवात केली. परंतु लगेच पाऊस थांबल्यानंतर पुन्हा खुर्च्या बाहेरील व्यासपीठावर आणण्यात आल्या; परंतु सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने उपस्थितांनी डोममध्ये आश्रय घेतला. त्यानंतर जोर वाढल्याने व्यासपीठावरील खुर्च्या डोममधील व्यासपीठावर हलवण्यात आल्या. तोपर्यंत उपस्थित बहुसंख्य शेतकऱ्यांनी घरचा रस्ता धरला हाेता.