आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कागदविरहित प्रशासनावर भाजपचे संशोधन : गडकरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - देशात कागदविरहित प्रशासनाच्या मॉडेलवर भारतीय जनता पक्ष संशोधन करत आहे, अशी माहिती पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी शुक्रवारी अमरावतीत दिली. एका खासगी कार्यक्रमानिमित्त गडकरी अमरावतीत आले होते. त्या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देशातील आर्थिक, औद्योगिक क्षेत्र प्रगतीच्या मार्गावर जाईल, असे गडकरी म्हणाले. ‘डिपार्टमेंट ऑफ ई-गव्हर्नन्स’ अशा प्रकारचे एक नवे प्रशासकीय मॉडेल भारतीय जनता पक्ष विकसित करत आहे. ‘पेपरलेस’ कार्यालयाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी चार हजार सहकार्‍यांच्या मदतीने 68 विभागांमध्ये संशोधन सुरू आहे. जगात ज्या-ज्या देशांनी ई-गव्हर्नन्स पद्धतीचा पुरस्कार केला, अशा सर्व देशांतील कागदविरहित कार्यालयांच्या कारभाराचे नमुने भाजपच्या संशोधक चमूने एकत्रित केले आहेत. या पद्धतीमुळे सरकारी कार्यालयांमधून कागद बाद होईल. केंद्र सरकार, राज्य सरकार, विभागीय आयुक्त कार्यालये, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका अशी सर्व कार्यालये संगणकाने जोडली जातील आणि कोणत्याही कामाकरिता एका विभागातून दुसर्‍या विभागात कागद फिरवावा लागणार नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.