आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Gadkari News In Marathi, BJP, Highway And Shipping Minister, Amravati

अमरावती-अकोला राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी पुढाकाराचे गडकरींचे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गत अनेक दिवसांपासून रखडलेल्या अमरावती-अकोला राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला नव्याने वेग मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अनेक दिवसांपासून बंद पडलेले हे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी केंद्रीय भूपृ़ष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकाराचे संकेत दिले आहेत.

नागपूर ते जळगाव-खानदेश आणि तेथून पुढे गुजरात सीमेपर्यंत गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -6 च्या चौपदरीकरणाचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. नागपूर ते अमरावतीपर्यंतच्या महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे.

गुरुकुंज मोझरी येथील काही किलोमीटरचा परिसर वगळल्यास महामार्गाला आधुनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे अमरावती- नागपूर येथील महामार्ग वाहतूक आणखी वेगाने करणे शक्य झाले आहे. परंतु, अमरावती-अकोला आणि तेथून पुढे गुजरात सीमेपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून खोळंबले आहे.

महामार्ग प्रशस्तीकरणाचे हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात आहे. कंत्राटदार आणि एनएचएआय यांच्यात काही मुद्दय़ांवरून पेच निर्माण झाल्याने प्रशस्तीकरणाचे काम तूर्तास थांबले आहे. त्यावर एनएचएआयच्या माध्यमातून तोडगा काढण्यास भूपृष्ठ मंत्रालयाने सुरुवात केली आहे. त्यातच या खात्याने मंत्री असलेले नितीन गडकरी यांचा विदर्भ विशेषत: नागपूर, अमरावती, अकोला कनेक्ट पाहता त्यांनी अलीकडेच या कामाची माहिती घेतल्याचे त्यांच्या मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे गडकरी यांच्या पुढाकारातून महामार्गाच्या प्रशस्तीकरणाचा रखडलेला मुद्दा मार्गी लागण्याचे संकेत व ठप्प झालेला विकास नव्याने सुरू होण्याचे संकेत आहेत.

तीन खासदारांचा पाठपुरावा
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या रखडलेल्या कामासंदर्भात तीन खासदार सरसावले आहे. हे तीन खासदार आहेत अमरावतीचे आनंदराव अडसूळ, अकोल्याचे संजय धोत्रे, बुलडाण्याचे प्रतापराव जाधव. सुमारे 250 किलोमीटरचा महामार्ग या तीन जिल्ह्यांतून जातो. महामार्गाचे प्रशस्तीकरण झाल्यास वरील तीन जिल्ह्यांच्या वाहतुकीला व पर्यायाने विकासाला गती मिळेल, असे गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करताना तिन्ही खासदारांनी नमूद केले असून, गडकरींनी यासंदर्भात तातडीने दखल घेण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे हे काम मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.