आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लागली विठ्ठल दर्शनाची आस; जायला मिळेना बस..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पंढरपूर यात्रेसाठी प्रवाशांच्या संख्येनुसार बस उपलब्ध करण्याचे आश्वासन राज्य परिवहन महामंडळाने दिले होते. ते फोल ठरल्याचे चित्र शनिवारी दिसून झाले. दोन बसएवढी प्रवाशांची गर्दी झाली, तरी त्यांना बससाठी अनेक तास प्रतीक्षा करावी लागली. काही प्रवाशांना सायंकाळी सुटणा-या अमरावती-पंढरपूर बसमध्ये जागा देण्यात आली.

अमरावती आगारात बसचा तुटवडा असल्याचा फटका पंढरपूरला जाणा-या भाविकांना सहन करावा लागत आहे. पंढरपूरसाठी बसची वेळ ठरवण्यात आली नसली, तरी नियोजित संख्या पूर्ण होताच 24 तासांत केव्हाही बस सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वेसोबतच भाविक एसटी महामंडळाच्या बसने जाण्यास पसंती दर्शवत आहेत. शनिवारीदेखील 90 जणांचा जत्था सकाळपासूनच बस स्थानकावर होता. मात्र, त्यांना बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतरच बस मिळाली. त्याला अमरावती आगाराचे ढिसाळ नियोजन जबाबदार असल्याच्या प्रतिक्रिया भाविकांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केल्या.
प्रवाशांनी घेतला मंदिरात आश्रय : पंढरपूरला जाणा-या भाविकांसाठी आगार परिसरातच पेंडॉल उभारण्यात येणार होता. परंतु, अशा कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध झालेली नसल्याने आगार परिसरात मागील बाजूस असलेल्या शंकराच्या मंदिरात त्यांना ताटकळत राहावे लागले. दरम्यान, मध्येच दमदार पावसाने हजेरी लावल्याने त्यांची तारांबळ उडाली. मंडळाने धड भाविकांना बसण्यासाठीही पर्यायी व्यवस्था केली नसल्याने त्यांना झाड, मंदिर व वाहनतळाचा आडोसा घ्यावा लागला.

बसचा तुटवडा
यात्रेसाठी विभागाला एकही नवीन बस देण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तथापि, पंढरीच्या वारीसाठी जिल्ह्यातील आठ आगारांमधून 65 विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तथापि, वाहनांचा तुटवडा असल्याने प्रवाशांना तासन्तास बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.

एका तासात सुटेल गाडी
४44 प्रवासी जमल्यानंतर साधारणत: एका तासाच्या अवधीत बस सोडण्यात येते. याशिवाय आगारात बस उपलब्ध नसल्यास इतर आगारांतून पर्यायी व्यवस्था करण्यात येते.
नीलेश बेलसरे, आगार व्यवस्थापक.

ताटकळत राहावे लागले
- आम्ही 90 प्रवासी होतो. त्यानंतरही तब्बल पाच तास ताटकळत राहावे लागले. फलाटावर बस इतक्यातच लागेल एवढेच चौकशी कक्षातून सांगितले जात होते. एसटी प्रशासनाच्या सोयीनेच बस सोडण्यात आली. महादेव चरपे, प्रवासी

असा घडला घटनाक्रम
जवळपास 45 प्रवाशांचा गट बससंदर्भात चौकशी कक्षात विचारपूस करण्यासाठी गेला.
आगार परिसरातील मंदिरात जवळपास 90 प्रवासी बसच्या प्रतीक्षेत होते.
बसची वाट पाहून कंटाळलेले काही प्रवासी रेल्वेने जाण्यासाठी निघाले.
चौकशी कक्षात विचारपूस करूनही प्रवाशांना योग्य उत्तर मिळाले नाही.
एका तासात बस सुटेल, असे आगार व्यवस्थापकांनी भाविकांना सांगितले.
बराच वेळाच्या प्रतीक्षेनंतर एकदाची बस फलाटावर लागली.
अखेर 44 प्रवाशांना घेऊन पंढरपूरसाठी एकदाची बस रवाना झाली.