आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झोलंबा येथील चौघांचा मृत्यू पापडातील विषबाधेमुळे नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्ह्यातील केदारखेड (झोलंबा) येथे ज्वारीचे ओलसर पापड खाल्ल्यामुळे पाच जणांना विषबाधा होऊन त्यातील चार जण दगावले होते. या आकस्मिक मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी अन्न औषधी प्रशासन विभागाने ज्वारीच्या पापडासाठी वापरण्यात आलेल्या कच्च्या साहित्याचे नमुने राज्य अन्न चाचणी प्रयोगशाळेत पाठवले होते.
नुकताच प्रयोगशाळेकडून हा अहवाल प्राप्त झाला असून ज्वारीच्या पापडासाठी तयार केलेल्या मिश्रणातून विषबाधा झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मृत्यूसाठी कारणीभुत ठरलेली विषबाधा नेमकी कशामुळे, हा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांपुढे आहे.
सतीश रामभाऊ निहारे (२२), जय किशोर निहारे (३) पूर्वा प्रवीण निहारे (५), आदर्श अंबादास परसे (११) अशी मृतकांची नावे आहेत. निहारे कुटुंबाकडे सांत्वनासाठी नातेवाईक जमलेले असताना पाच जणांना विषबाधा होऊन चार जण दगावल्याची ही दुर्दैवी घटना घडली होती. रविवारी निहारे कुटुंबातील रितेशने सकाळी घरी ज्वारीचे ओलसर पापड खाल्ल्याने त्याची प्रकृती बिघडली होती.
दरम्यान, हिवरखेड येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले. परंतु, त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात भरती केले होते. परंतु, उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी रितेशची प्राणज्योत मालवली. त्यामुळे निहारी कुटुंबाच्या सांत्वनासाठी मृतक रितेशची खापरी (ता. काटोल) येथील त्याची मावशी, मावशीचे मुले आदर्श प्रिया ही दोघे भावंडेही मंगळवारीच केदारखेड येथे आली होती. दरम्यान, बुधवारी मृतक रितेशचा भाऊ सतीश, जय, आदर्श, पूर्वा प्रिया या पाचही जणांनी वाळायला टाकलेले ज्वारीचे पापड खाल्ले. त्यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने पाचही जणांना मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना तत्काळ अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान जय किशोर निहारे, आदर्श अंबादास परसे यांचा मृत्यू झाला, तर सतीश निहारे, पूर्वा निहारे यांची सुध्दा त्याच दिवशी प्राणज्योत मालवली. या पाचही जणांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असावा, अशी चर्चा परिसरातील नागरीकांमध्ये सुरू होती. त्यामुळेच ज्या ज्वारीचे पापड खाल्ल्याने विषबाधा झाली असावी, असा अंदाज होता. त्या पापडासाठी वापरलेले साहीत्याचे नमुने अन्न औषध प्रशासनाने पुणे येथील राज्य अन्न चाचणी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालावरून ही विषबाधा पापडाच्या साहीत्यांमधून झालेली नाही. त्यामुळे मृत्यूसाठी कारणीभ्ूत ठरलेले विष आले कोठून याचा शोध पोलिस घेत आहे.
फॉरेन्सिक लॅब, व्हीसेरा रिपोर्टची प्रतीक्षा
बेनोडा पोलिसांनी या नमुन्यासोबतच काही नुमने यवतमाळ नागपूर येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवले आहे. याचवेळी व्हीसेरासुध्दा तपासणीसाठी पाठविण्यात आलेला आहे. आता केवळ अन्न चाचणी प्रयोगशाळेचा अहवाल आला आहे मात्र नागपूर, यवतमाळच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाकडून, तसेच व्हीसेराचा अहवाल आणि फॉरेन्सिक लॅबकडून येणारा अहवाल बाकी आहे. तो आल्यानंतर मृत्यूचे कारण पुढे येईल. असे बेनोडाचे ठाणेदार मुकूंद ठाकरे यांनी सांगितले.
मृतकांना पापडातून विषबाधा नाही
- पापड तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या साहित्याचे नमुने पुणे येथील राज्य अन्न चाचणी प्रयोगशाळेकडे आम्ही घटनेनंतर पाठवले होते. त्यांच्याकडून नुकताच अहवाल प्राप्त झाला आहे. पापडाच्या या साहित्यामधून विषबाधा (फुड पॉयझनिंग) झाले नसल्याचे अहवालात नमूद आहे.
एम.एस. देशपांडे, सहायक आयुक्त. (अन्न औषध प्रशासन)