अमरावती - साखळी व बाद फेरीतील सामने संपून फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा उपांत्यपूर्व सामन्यांकडे वळताच ‘फुटबॉल फिव्हर’ने परमोच्च बिंदू गाठला आहे. या स्पर्धेतील मैदाने व इतर सुविधा नेत्रदीपक असताना शहरातील फुटबॉलपटूंच्या नशिबी आजही पायाला टोचणा-या खडीचे मैदानच आहे.
सायनस्कोर मैदानावर सर्वच खेळांसाठी पायाभूत सुविधा उभारल्यास शहरातील क्रीडाप्रतिभेला ख-या अर्थाने पैलू पडतील, असे मत काही नागरिकांनी व्यक्त केले आहे. हे मैदान फुटबॉल खेळण्यालायक करावे, अशी मागणी फुटबॉल शौकिनांनी केली आहे. सध्या बर्म्युडा गवताची कमतरता, दगड व बारीक खडी, खड्डे असलेल्या मैदानावर उदयोन्मुख फुटबॉलपटूंना सराव करावा लागत आहे. या मैदानाचे क्षेत्र 100 बाय 70 मीटर अशा आंतरराष्ट्रीय मानकानुसार विकसित केले जाऊ शकते. यांसह अन्य आवश्यक सुविधा मिळाल्यास येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील, असा आशावाद क्रीडातज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा परिषद आकारते शुल्क
सायन्सकोर मैदानावर फुटबॉल नियमितपणे खेळला जातो. येथे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धाही होतात. मैदानावर कोणतीही स्पर्धा घेतल्यास जिल्हा परिषद संबंधित क्रीडा संघटनेकडून दरदिवशी शंभर ५ आकारते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मैदान असावे मैदानासारखे!
- शहरात फुटबॉलच्या चाहत्यांची संख्या भक्कम असून, दर्जेदार खेळाडूही आहेत. मात्र, मैदानाची दुरावस्था झाली आहे. हिरवे गवत तथा आवश्यक सुविधांचा येथे अभाव आहे. त्यामुळे दगड, खडी पायाखाली घेत सराव करावा लागतो. संदीप मिश्रा, फुटबॉलपटू
मैदान फुटबॉलसाठी राखीव करावे
- मैदानाची देखरेख, सुरक्षितता किंवा एखादी स्पर्धा यासंदर्भात जिल्हा परिषद कुठलीही आर्थिक मदत करत नाही. स्पर्धेचा व मैदान तयार करण्याचा खर्च जिल्हा फुटबॉल असोसिएशनलाच करावा लागतो. सायन्सकोर मैदान फुटबॉलसाठी राखीव करावे, जेणेकरून येथे राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडतील. प्रा. जे. के. चौधरी, उपाध्यक्ष, जिल्हा फुटबॉल असोसिएशन.
काय आहेत समस्या?
० प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी नाही
० खेळाडूंसाठी ड्रेसिंग रूम नाही
० पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही
० प्रसाधनगृहाची सुविधा नाही
० चौकीदार नाही
० मैदानावरील मुख्य लोखंडाचे प्रवेशद्वार चोरीला गेले आहे
० भिंतीचे कुंपण नसल्याने मोकाट जनावरांचा वावर
० मैदानावरच दुर्गंधी तसेच घाणीचे साम्राज्य
फोटो - सायन्सकोर मैदानावर फुटबॉल खेळण्यात गर्क शहरातील उदयोन्मुख प्रतिभा. छाया : शेखर जोशी