आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५६ महाविद्यालयांना प्राचार्यांची आहे प्रतीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - संतगाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत येणा-या ५६ अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राचार्य नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनुदानित महाविद्यालयांची संख्या १६० असून, त्यांतील ५६ कॉलेज प्राचार्यविना चालत असल्याचे दिसून येत आहे. कायम विनाअनुदानित प्रमाणे अनुदानित महाविद्यालयांची स्थितीदेखील वाईट असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. शिवाय यामुळे पश्चिम विदर्भात शिक्षणाचा अनुशेष निर्माण होत आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत येणा-या कायम विना अनुदानित महाविद्यालयांची स्थिती वाईट अाहे. विद्यापीठ अंतर्गत २५२ कायम विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये नियमित प्राचार्य कर्मचारी नसल्याची माहिती समोर आली. यासोबतच ५६ अनुदानित महाविद्यालयांचेदेखील तेच हाल असल्याचे स्पष्ट आहे. डॉ. आर. एम. सदन यांच्याकडून १४ मार्च रोजी झालेल्या सिनेटच्या बैठकीत याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. डॉ. सदन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना विद्यापीठाकडून प्राचार्यांच्या रिक्त पदांची वास्तविकता समाजासमोर आणली. प्राचार्य नसल्याने महाविद्यालयाचे कामकाज प्रभावित तर होतेच; शिवाय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानदेखील होत आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतून लाखो विद्यार्थी विद्यापीठाची परीक्षा देतात, यामध्ये अनुदानित तसेच कायम विनाअनुदानित महाविद्यालयांचा समावेश आहे.

१०८ महाविद्यालयांत नियमित प्राचार्य आहेत, तर ३१० महाविद्यालयांचा कारभार प्राचार्यांशिवाय होत असल्याचा प्रकार समोर आहे. महाविद्यालयात हे प्राचार्य एक ते दहा वर्षांपासून नसल्याची बाबदेखील समोर आली. कायम विना अनुदानित महाविद्यालयांचे एक वेळ ठिक आहे, अनुदानित महाविद्यालयांना प्राचार्य मिळू नये, ही शरमेची बाब आहे.विद्यापीठ अंतर्गत येणा-या अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राचार्याची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असताना विद्यापीठ प्रशासनाने मात्र यावर थातूरमातूर उत्तरे दिली.

केवळ पाठपुरावा
नियमितप्राचार्यांची नियुक्ती करण्याबाबत विद्यापीठाकडून महाविद्यालयांना पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहार करीत विद्यापीठ प्रशासनाकडून केवळ पाठपुरावा केला. एकाही महाविद्यालयावर दंडात्मक कारवाई केली नाही किंवा मान्यता रद्द करण्याची शिफारस केली नाही, हेदेखील वास्तव आहे.

प्राचार्य का नको ?
नियमितप्राचार्य नसल्याने कर्मचा-यांचे वेतन काढता येत नाही. कर्मचा-यांचे वेतन काढण्यासाठी प्राचार्यांची स्वाक्षरी आवश्यक आहे. नियमित प्राचार्य नसलेल्या महाविद्यालयात प्रभार देत कर्मचा-यांचे सहा महिन्यांचे वेतन काढले जाते. असे प्रकार अनेक महाविद्यालयांत होत आहेत. महाविद्यालय चालवणा-या संस्थांना नियमित प्राचार्य का नको, हे मात्र कोडेच आहे.

कारणे हास्यास्पद
प्राचार्यांचीरिक्त पदे भरण्यासाठी महाविद्यालयांकडूनच प्रयत्न केले जात अाहेत. मात्र, त्यांना पात्र उमेदवार मिळत नसल्याचे उत्तर दिले. विभागातील पाच जिल्ह्यांचे परिक्षेत्र असलेल्या क्षेत्रात प्राचार्य पदासाठी पात्र शिक्षक मिळू नये, ही लज्जास्पद बाब आहे. विद्यापीठ प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.