आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Now Rajendra Darda Not Popular In Yavatmal City For Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय पकड - यवतमाळात दर्डा, दादा गटांची दाणादाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - यवतमाळमध्ये अनेक वर्षांपासून आपली राजकीय पकड ठेवून असलेल्या दर्डा, दादा गटाची मात्र या विधानसभा निवडणुकीत दाणादाण झाली आहे. या गटांच्या नेत्यांचे आपल्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याने यवतमाळ विधानसभेची जागाही आता त्यांनी कायमची गमावली आहे. दरम्यान, अशीच स्थिती राहिली, तर काँग्रेसमधील हे दोन्ही गट कायमचे बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जवाहरलाल दर्डा आणि त्यानंतर विजय दर्डा यांनी यवतमाळच्या राजकारणात स्वत:चे वेगळे असे अस्तित्व निर्माण केले होते.
उत्तमराव पाटील, माणिकराव ठाकरे यांच्या सोबतच यवतमाळच्या राजकारणात दर्डा गटाचे वेगळे स्थान कायम होते. आता, मात्र विजय दर्डा कायमचे नागपूर येथे वास्तव्यास असल्याने त्यांचे यवतमाळच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाले आणि या गटाची पुरती वाताहत झाली आहे. सध्या या गटाचे नेतृत्व एकटे बाळासाहेब मांगूळकर हे सांभाळत आहेत. सध्या ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. नुकतेच ते यवतमाळच्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. मिळालेल्या माहितीनुसार, विजय दर्डा यांनी बाळासाहेब मांगूळकर यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले. मात्र, यश मिळाले नाही. माणिकराव ठाकरे यांनी दिल्लीदरबारी वजन वापरून आपल्या मुलासाठी तिकीट आणून निवडणूक मैदानात उतरवले. माणिकराव ठाकरे यांचा हा "वॉर' दर्डा गटासाठी चांगलाच जिव्हारी भिडणारा आहे. आता येणाऱ्या काळात दर्डा गटाचे अस्तित्व टिकवायचे की नाही, हे त्यांच्या नेत्यांनाच विचार करायला लावणारे आहे.विजय दर्डा हे यवतमाळात कधी आले तरी कार्यकर्त्यांची साधी बैठकसुद्धा घेत नसल्याची नाराजी कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.
गटबाजी राहणार कायम
यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसचे वेगवेगळे गट कायम आहेत. यातील काही गट अस्ताला आले, तर काही स्वत:चे अस्तित्व टिकवून आहेत. शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, वामनराव कासावार, विजय खडसे, माणिकराव ठाकरे यांचेही आता आपसात सतत वाद सुरू राहतात. हे नेते कधी-कुणाला जाऊन मिळतील, हेही सांगता येत नाही. या नेत्यांची मुलेही आता राजकारणात उतरत आहेत. त्यामुळे ही गटबाजी तूर्तास तरी संपुष्टात येण्याची चिन्हे दिसून येत नाही.
हातोड्याला लागला गंज!
यवतमाळच्या राजकारणात दादा उपाख्य उत्तमराव पाटील यांची मोठी ताकद होती. ते सहा वेळा लोकसभा निवडणूक जिंकले होते. त्यांच्याऐवजी काँग्रेसने दुसऱ्याला उमेदवारी दिल्यास संबंधिताला सपाटून मार खावा लागत होता. याचा अनुभव गुलाम नबी आझाद तसेच हरिभाऊ राठोड यांना लोकसभा निवडणुकीत आला आहे. ह्यमला कुणाला-केव्हा कसा हातोडा मारावा लागतो, ते चांगले ठाऊक आहे हे त्यांचे वक्तव्य राजकारणात स्वत:ची असलेली दादागिरी दर्शवणारे होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र राजू तसेच मनीष मात्र ही ताकद टिकवून ठेवू शकले नाहीत, तर एकीकडे दादा तसेच दर्डा गटांचा अस्त होत असतानाच राहुलच्या रूपात ठाकरे गट मात्र स्वत:चे अस्तित्व टिकवण्याच्या तयारीला लागला आहे.