आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Offscourings Dam Removal Will Create New Money Only

गाळ काढण्यास लागेल नव्या धरणा इतकाच पैसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहराला पाणीपुरवठा करणार्‍या अप्पर वर्धा प्रकल्पात पावसाच्या पाण्यासोबत जमा होणारा गाळ काढायचे झाल्यास, नवीन धरण तयार होईल इतका पैसा सरकारला खर्च करावा लागू शकतो. हे धक्कादायक वाटत असले तरी हीच वस्तुस्थिती आहे. अमरावती शहराला अप्पर वर्धा प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. पावसाच्या पाण्यासोबतच धरणात गाळ जमा होत आहे. मोठय़ा प्रकल्पांमधून गाळ काढता येत नाही. त्यातल्या त्यात अप्पर वर्धा धरण हे बरेच मोठे व खोल आहे. त्यामुळे धरण पूर्णपणे गाळाने भरत नाही आणि जलसाठा मृत साठय़ात रूपांतरित होत नाही, तोवर प्रतीक्षा करणे हाच उपाय आहे. पण, एकदा अप्पर वर्धातील जलसाठय़ाचे रूपांतर मृत साठय़ात झाले आणि गाळ काढायची गरज भासल्यास, हा खर्च काही कोटी रुपयांमध्ये येऊ शकतो, असा जलसंपदा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकार्‍यांचा अंदाज आहे. सध्या अप्पर वर्धा प्रकल्पातील गाळाचे प्रमाण सात टक्के आणि मृत साठा 114.22 दशलक्ष घनमीटर आहे.
वीजनिर्मितीसाठीही लागणार मोठय़ा प्रमाणावर पाणी
सरकारच्या निर्णयानुसार लवकरच अप्पर वर्धा प्रकल्पातून इंडिया बुल्सच्या वीज प्रकल्पासाठीही पाणी द्यावे लागणार आहे. या प्रकल्पातून 87 दशलक्ष घनमीटर पाणी या प्रकल्पाला जाईल. वीजनिर्मिती करण्यासाठी यापुढील काळात मोठय़ा प्रमाणावर पाणी लागणार असल्याने अमरावतीकरांना आतापासूनच पाणी वाचवावे.
धरण बरेच खोल
अप्पर वर्धा प्रकल्प सुमारे 40 मीटर खोल आहे. त्यामुळे धरणातून गाळ काढणे शक्य नाही. मोठय़ा प्रकल्पाची उभारणी करताना प्रकल्पात किती गाळ जमा होईल, याचे नियोजन केलेले असते. मात्र, लोकसंख्यावाढीचे प्रमाण बघता अप्पर वर्धा शेकडो वर्षे अमरावतीकरांची तहान भागवण्यासाठी पुरणार नाहीच, असे तज्ज्ञांचे मत आहे.
एक-एक थेंबाचा हिशेब
कोणत्याही प्रकल्पातून किती पाणी सोडले जाईल, याचे नियोजन ठरलेले असते. त्यापेक्षा एक थेंबही जादा पाणी जलसंपदा विभागाला सोडता येत नाही. अप्पर वर्धातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सिंचन विभाग, इंडिया बुल्स यांचे पाण्याचे आरक्षण निश्चित आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यास एक थेंब पाणीही जादा सोडायचे झाल्यास अनेक प्रशासकीय सोपस्कार पार पाडावे लागतील.