आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदा झाला ‘गोड’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मागील वर्षी कांद्याच्या भाववाढीचा मोजक्याच शेतकर्‍यांना फायदा झाला होता; परंतु यावर्षी शेतकर्‍यांना जागेवर 1,700 रुपये दर मिळत असल्याने कांदा प्रथमच शेतकर्‍यांसाठी ‘गोड’ ठरला आहे. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे मागील वर्षी कांद्याचे दर सहा हजार रुपयांवर गेले होते. पश्चिम महाराष्ट्रातही कांद्याचे उत्पादन घटले होते. याचाच परिणाम किरकोळ भावावर होऊन भाव 80 रुपये प्रती किलोवर पोहोचले होते. कांद्याचा हंगाम सुरू झाल्यानंतर मागील वर्षी प्रथमच जागेवरून शेतकर्‍यांना 600 ते 700 रुपये दर मिळाला होता. त्यानंतर पंधरा दिवसांतच कांदा दोन हजार रुपयांवर गेला होता. त्यानंतर सतत कांद्याच्या भावात वाढ होऊन तो सहा ते सात हजारांवर पोहोचला होता. दरम्यान, जागेवरून 600 ते 700 रुपये दर मिळत असल्याने जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्‍यांनी कांदा विकून टाकला होता. व्यापार्‍यांनी त्यास मोठय़ा प्रमाणात खरेदी करून त्याची साठवणूक केली होती. कांद्याचे दर सहा ते सात हजारांवर गेल्यानंतर याचा फायदा व्यापार्‍यांनाच झाला होता; परंतु या वर्षी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रासह जिल्ह्यातील कांद्याचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यामुळे कांद्याचा हंगाम सुरू झाल्याबरोबर शेतातूनच कांद्याला 1,500 ते 1,700 रुपये दर मिळत आहे. दरम्यान, कांद्याला गारपिटीचा तडाखा बसल्यामुळे सडण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यातही यावर्षी एकरी उत्पादनातही घटझाली आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढण्याची शक्यता असल्यामुळे यावर्षी बहुतांश शेतकर्‍यांनी कांद्याची साठवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या भाववाढीचा फायदा शेतकर्‍यांना मिळू शकतो, असा अंदाज व्यापार्‍यांनी व्यक्त केला आहे. सध्या कांद्याला शेतकर्‍याच्या दारात 1,700 रुपये दर मिळत असूनही कांदा मिळवण्यासाठी व्यापार्‍यांना दारोदार भटकावे लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
कांदा 1,800 रुपये : अमरावती कृषिउत्पन्न बाजार समितीत बुधवारी कांद्याला 1,800 रुपये दर मिळाला. सोमवारी कांद्याला 1,900 रुपये दर मिळाला होता. पाऊस येण्यापूर्वीच कांद्याच्या भावात तेजी असल्यामुळे कांद्याचे झालेले नुकसान व घटलेल्या उत्पादनामुळे ही तेजी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकर्‍यांनी कांदा साठवून ठेवल्यामुळे बाजारात आवकही र्मयादित आहे. आज बाजारात केवळ 100 क्विंटल कांद्याची आवक झाली.
‘लाटन’ही तेजीत : सडण्याच्या प्राथमिक अवस्थेत असलेल्या कांद्याला ग्रामीण भागात ‘लाटन’ असे संबोधण्यात येते. त्यामुळे शेतकरी हा कांदा वेचून, फेकून देतात किंवा गुरांना खाऊ घालतात. साधारणपणे हा कांदा हॉटेलमध्ये नियमित बनवण्यात येणार्‍या व्यंजनात वापरला जातो. या कांद्याची बाजारात अत्यंत किरकोळ किंमत राहत असल्याने व बाजारात विकण्यासाठी नेण्याचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी त्याला फेकून देणे पसंत करतात. परंतु यावर्षी प्रथमच ‘लाटन’चेही व्यापारी गावात हा कांदा मिळवण्यासाठी गावोगाव भटकंती करीत आहेत. या कांद्याला 150 रुपये कट्टा (40 कि.) असा दर मिळत आहे.