आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन सातबाराने शेतकऱ्यांची डोकेदुखी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ऑनलाईन सातबारावर अजूनही हाताने लिहिले जाते. )
शिरजगाव कसबा- कामकाज सुरळीत सुलभ व्हावे म्हणून प्रत्येक क्षेत्रात संगणकीकरण करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून शेतीचा सातबाराही ऑनलाईन करण्यात आला आहे. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन सातबारा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
पावसाळ्याला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना कर्जासाठी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सातबारा आवश्यक असतो. यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ऑनलाईन सातबारा सुरू केला. मात्र त्यातही अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. सातबारा ऑनलाईन होऊनही शेतकऱ्यांना तलाठ्यांकडेच चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र येथे पहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे या ऑनलाईन सातबारावर डिजीटल स्वाक्षरी नसल्याने अनेक चुका असल्याने शेतकऱ्यांना ऐन खरिपाच्या तोंडावर सेतू ते तलाठी कार्यालय अशा चकरा माराव्या लागत आहेत.
ई-महा सेतू केंद्रात दर पत्रकही लावले नसल्याने कोणत्या कागदपत्रांसाठी किती रुपये मोजावे लागतात, याची साधी कल्पनाही शेतकऱ्यांना नाही. सेतू केंद्र संचालक मन मर्जीप्रमाणे शेतकऱ्यांकडून पैसे उकळत असतात. इतकेच काय तर त्याची साधी पावतीही दिली जात नाही. शेतकऱ्यांच्या गरजेचे गैरफायदा घेत अतिरिक्त मागणी केली जात असल्याचे चित्र सेतू केंद्रात सध्या पहायला मिळत आहे. ई- महासेतू केंद्राच्या संचालकांनी नियमाप्रमाणे काम करून शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अशी प्रतिक्रिया पंडित लेवटे यांनी व्यक्त केली.
वेळेचा अपव्यय
- यापूर्वी हस्तलिखितामध्ये मिळणाऱ्या सातबाराचे काम कमी वेळात होत होते. ऑनलाईनमुळे वेळेचा अपव्यय होत आहे.
आशिष उमक, शेतकरी
सहकार्य करावे
- काही तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन सातबारामध्ये चुका आहेत. शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.
पी. एन. काझी, तलाठी
विजेचा प्रश्नही गंभीर : ग्रामीण भागात विजेचा प्रश्नही गंभीर आहे. लाईन गेल्यानंतर सेतू केंद्रात कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव एकक प्रिंट घेण्यासाठी कित्येक तास ताटकळत बसावे लागते.
शेतकऱ्यांना पडलाय प्रश्न : ऑनलाईन सातबाराचा लगीनघाई शासनाच्या वतीने करण्यात आली. मात्र त्याचाही पार ताल झाला आहे. शासनाने ऑनलाईन सातबाराची घाई का केली, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
बातम्या आणखी आहेत...