आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Only One Case Of Drunk And Drive In Amravati On 31 Dec 2014

अहो आश्चर्य! अमरावतीत थर्टी फर्स्टच्या रात्री केवळ एकच तळीराम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘थर्टीफस्ट’च्या रात्री मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईचा आकडा दरवर्षी किमान दुहेरीचा टप्पा तरी गाठतोच. यंदा मात्र, मोठे आश्चर्य घडले आहे. ३१ तारखेच्या रात्री मद्य प्राशन करून वाहन चालवल्याप्रकरणी केवळ एका वाहनचालकावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

शहरातील कडेकोट पोलिस बंदोबस्त आणि अचानक बरसलेल्या पावसाने अनेक मद्यप्रेमींना चार भिंतींच्या आतच ‘थर्टी फस्ट’ साजरी करावी लागल्याचे पोलिसांच्या या आकडेवारीवरून दिसून येते. थर्टी फस्टला शहरातील प्रत्येक मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

३१ तारखेला रात्री शहरातील २७ फिक्स पॉईन्ट, २९ ठिकाणी नाकाबंदी, गुन्हे शाखेचे आठ गस्तपथक, महीलांचे सात पथक याव्यतिरीक्त प्रत्येक ठाण्याचे गस्त पथक, पोलिस आयुक्त, दोन्ही उपायुक्त, चारही सहायक पोलिस आयुक्त आणि प्रत्येक ठाणेदारांची शहरात सातत्याने गस्त सुरू होती. यासोबतच रात्री साडेबाराच्या सुमारास नववर्षाच्या स्वागतासाठी पावसानेही जोरदार हजेरी लावली. यासर्व कारणांमुळे तळीरामांनी वाहन घेऊन रस्त्यावर येणे टाळलेच. त्यामुळेच केवळ फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना एकच वाहनचालक हा मद्य प्राशन करून वाहन चालवताना आढळला त्याच्याविरुध्द पोलिसांनी कारवाई केली आहे.
संपुर्ण रात्रभर शहर शांत सुनसान होते. जे काही मोजकेच दुचाकीवर दिसायचे ते सुध्दा मद्य प्राशन केलेले होते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि ३१ डिसेंबरपूर्वी करण्यात आलेली जनजागृती याचा यंदा चांगला फायदा झाल्याचे दिसून आले.

यामुळे यंदा थर्टी फस्टच्या रात्री शहरात एकही अपघात झाला नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तळीराम वाहनचालकांची संख्या वाढल्यास अपघात होतो आणि नववर्षाच्या आनंदात विरजण पडल्याशिवाय राहत नाही. मात्र, यंदा चित्र वेगळेच दिसून आल्याने रात्रभर गस्तीवर असलेल्या पोलिसांनीही समाधान व्यक्त केले आहे.

अनेकांनी घेतला ऑटोचा आधार
मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास पोलिस पकडणार या धास्तीने अनेकांनी यंदा अभिनव शक्कल लढवत अॅटोचा आधार घेतला. ऑटोत बसून घरी गेल्यास स्वत:ही सुरक्षित राहतो आणि पोलिसांच्या कारवाईपासून वाचताही येते याची खात्री असल्याने ३१ च्या अनेकांनी अॅटोचा आधार घेतल्याचे दिसून आले. काहींनी गाडी सोडून पायदळ चालण्यातही आनंद मानला.