वरुड - खचलेल्याविहीरीच्या अनुदानाची मागणी करण्यासाठी आलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांची खुर्ची तोडल्या प्रकरणी ७१ शेतकऱ्यांविरुद्ध बुधवारी (दि. १७) रात्री गुन्हे दाखल करण्यात आले.
दरम्यान, शेतकऱ्यांची टोलवाटोलवी करणाऱ्या अधिकाऱ्यांना या पुढे चोप देण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर यांनी दिला आहे. अतिवृष्टीने खचलेल्या विहीरीच्या सर्वेक्षणामध्ये घोळ झाल्याने बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवीकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. दरम्यान, तहसीलदार हजर नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी त्यांच्या खुर्चीची तोडफोड केली होती. याप्रकरणी वरुड पोलिस ठाण्यात रात्री भुयार यांच्यासह ७० शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
नायब तहसीलदार एम. के. असनानी यांनी याबाबतची तक्रार दाखल केली होती. सध्या दिलासा यात्रा सुरू असून ती ३१ डिसेंबर रोजी संपणार असल्याची माहिती तुपकर यांनी दिली. त्यानंतर संघटनेचे नेते सदाभाऊ खोत मुख्यमंत्र्यांना गुन्हे मागे घेण्याची विनंती करणार आहे. दरम्यान, आतापर्यंत शांततेच्या मार्गाने शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. परंतु यापुढे शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास अधिकाऱ्यांना चोप देऊ असेही तुपकर म्हणाले.