आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखो रुपयांच्या रसाळ संत्र्याचा झाला उकिरडा, शेतकरी व्यापारी दोघांचीही जबर हानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा - तालुक्यात संत्र्याची बेभाव विक्री करूनही काही व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला संत्रा तोडून नेल्यामुळे लाखो रुपयांचा संत्रा शेतकऱ्यांना तोडून फेकून द्यावा लागला. तालुक्यातील सावळी दातोरा, हरम, कविठा, मल्हारा, बोरगावपेठ आदी गावांतील शिवारात सध्या तोडून फेकलेल्या या संत्र्याचे ढिग लागले आहेत. या फळांचा लाखो रुपयांचा खर्च निघाला नसताना शेतकऱ्यांना पुन्हा नवीन बहारासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाच्या पैशांसाठी जुळवाजुळव करावी लागत आहे.

तालुक्यात संत्र्याच्या आंबिया बहाराचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. यावर्षी संत्र्यावर फुटीपासूनच नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, यावर्षी सोयाबीन, कपाशी, हरभरा आदी पिकांनी दगा िदल्यामुळे बहुतांश संत्रा उत्पादकांच्या आशा बागांवर टिकून होत्या.

मागील वर्षी जानेवारी सातत्याने झालेल्या गारपिटीमुळे आंबिया बहाराचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यातून काही प्रमाणात वाचलेल्या बागा चांगल्या बहरल्या. परंतु ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये वाढलेल्या तापमानामुळे ६० ते ७० टक्के चांगल्या दर्जाची संत्री गळून गेली. दरम्यान, ओक्टोबरच्या सुरुवातीला मिळणारे सरासरी २० हजार रुपये प्रती टन संत्र्याचे भाव सातत्याने घसरत गेले. अखेरपर्यंत संत्र्याचे भाव दहा हजार रुपये टनावर येऊन ठेपले. त्यामुळे चढ्या दराने खरेदी केलेल्या बागा व्यापाऱ्यांनी सोडून देणे सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागला. त्यातच नुकत्याच आलेल्या पावसाने कहर केल्यामुळे संत्री झाडावरच खराब झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी िनम्म्या बागा तोडून उर्वरित संत्री सोडून दिली. मोठ्या प्रमाणात गळण सुरू झाल्यामुळे सध्या व्यापाऱ्यांनी बागा खरेदीच बंद केली आहे. दरम्यान, अशा िस्थतीत नवीन बहार फोडण्यासाठी शेतकऱ्यांना लाखो रुपयांची संत्री तोडून बाहेर फेकावी लागत आहे. कविठा येथील किसनराव काळे, मल्हारा येथील पुरुषोत्तम बोरेकर, बोरगाव पेठ येथील अशोक जवंजाळ आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे.

धामणगाव गढी, धोतरखेडा, काकडा, रासेगाव, हरम, खांजमानगर, पथ्रोट आदी गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी संत्री तोडून फेकून दिली आहे.

व्यापाऱ्यांनाही जबर झटका
-अवकाळीपावसामुळे यावर्षी व्यापाऱ्यांनाही कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे तोट्यात गेल्यापेक्षा सौदे सोडून द्यावे लागले. अशा आपत्तीतून वाचण्यासाठी तालुक्यात शीतगृहांची व्यवस्था असणे आवश्यक आहे. राजेंद्रगोरले, व्यापारी

चार लाखांची बाग ९५ हजारांत
-चारएकरांतील बाग चार लाख रुपयांना मागितली होती. परंतु त्यानंतर ती ९५ हजारांना विकावी लागली.व्यापाऱ्याने काही संत्री तोडून नेल्यानंतर उर्वरित फळे तोडून फेकावी लागली. नव्या बहारासाठी पैसा कसा उभावा? हरिदासकाठोळे, सावळी दातुरा