आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानातील देवीचा अमरावतीत नवरात्रोत्सव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विदर्भाची कुलदैवत अंबामातेच्या दर्शनासाठी जसे राज्यातून भाविक अमरावतीत येतात, अगदी त्याचप्रमाणे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिंगलाजपूर येथील ज्वालामुखी हिंगलाज माता देवस्थानात भाविक गर्दी करीत आहेत. चैत्र नवरात्रनिमित्त दरवर्षी या ठिकाणी दूरवरून भाविक येथे दर्शनासाठी दाखल होत आहेत. इ. स. १३०३ मध्ये स्थापन झालेल्या या मंदिराला ६३० वर्षांचा इतिहास असून देवीचे मूळ स्थान पाकिस्तानातील वायव्य प्रांतात बलुचिस्तानात आहे.
सध्या चैत्र नवरात्र सुरू असल्याने देवीच्या दर्शनासाठी मंदिराचा परिसर फुलून गेला आहे. विदर्भातच नव्हे, तर महाराष्ट्रात आदिमाय शक्तीची मुख्य अशी साडेतीन पीठे आहेत. पूर्णपीठात कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुकादेवी, तर अर्धपीठात वणीची सप्तशृंगीदेवी अशी साडेतीन पीठे आहेत.
या मुख्य पीठाची १०८ उपपीठे असून िहंगलाजपूर येथील ज्वालामुखी हिंगलाज माता देवी संस्थान हे एक शक्तिपीठ आहे. अमरावती - अकोला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील लोणी टाकळी येथे रस्त्यावरच सूचना फलक लागले आहेत. लोणीपासून उजव्या बाजूस साधारणत: पाच ते सात किलोमीटरवर येथे पुरातन इतिहास असलेला ज्वलामुखी देवीचे मंदिर आहे. येथील मंदिर फार पुरातन असून नजरेत साठवून ठेवण्यासारखे आहे.महाप्रसादाचे आयोजन
दरवर्षीच देवीचा नवरात्र महोत्सव साजरा केला जातो. पौर्णिमेला गाडपगाडाचा कार्यक्रम घेण्यात येतो. साधारणत: दीड तास हा कार्यक्रम चालतो. त्यानंतर पालखी सोहळ्याचा मंगलमय कार्यक्रम होतो. महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप होणार, अशी माहिती संस्थानचे सेवाधारी प्रसाद भगत यांनी दिली.
उद्या गाडपगाड कार्यक्रम

दरवर्षी या ठिकाणी गाडपगाडचा देखणा कार्यक्रम होतो. यंदा रविवारी ५ मार्चला हा कार्यक्रम होणार आहे. ज्वालामुखी हिंगलाज मातेचे सेवाधारी चिमणाजी भगत यांच्या पिढीपासून सेवेचे कार्य सुरू आहे. सध्याची त्यांची नववी पिढी हा गाडपगाडचा कार्यक्रम होते. परशराम भगत यांचे नवव्या पिढीचे सेवाधारी रामदास भगत हे सेवाधारीचे कार्य करीत आहेत. या कार्यक्रमात ११ बैलबंडी ओढण्याची परंपरा आहे. गावातील ७०-८० भाविक या गाड्यांमध्ये बसतात. नवव्या पिढीचे रामदास भगत हे गाडे ओढत असल्याचे प्रसाद भगत यांनी सांगितले.
वायव्य पाकिस्तानात बलुचिस्तान प्रांतात हिंगलाज देवीचे मूळ स्थान

या मंदिराची स्थापना १३०३ मध्ये स्थापना केली. आज या मंदिराचा इतिहास ६३० वर्षांचा आहे. मंदिरात ज्वालामुखी हिंगलज मातेच्या मूर्तीची स्थापना केली. आश्विन शुद्ध अष्टमीला होमहवन व पौर्णिमेला गाडपगाडा (भक्ताने बैलगाड्या ओढणे)चा कार्यक्रम दरवर्षी साजरा होतो, अशी माहिती शेलगुंड येथील शिवदास रंगाचार्य यांनी दिली.
ज्वालामुखी हिंगलाज माताचे मूळ स्थान वायव्य पाकिस्तानमधील बलुचिस्तान येथील आहे. त्या ठिकाणी राज्य करीत असताना काचेचा सभामंडप, वाग्रउभारणी दरवाजा, काचेची दीपमाळ, काचेची बारादारी, काचेचे बुरूज, चिरेबंदी परगना, तुळशी वृंदावन व काचेचा दिवाणखाना असा देवीच्या वैभवाचा थाट होता.

मात्र, मनासारखा सेवाधारी भक्त मिळत नसल्याने सेवाधारी भक्ताचा शोध घेण्याचा त्यांनी मनाशी दृढनिश्चय केला. सेवाधारी भक्ताचा शोध घेण्यासाठी देवी व्याघ्ररूपी घोड्यावर शेषाचा चाबूक हातात घेऊन निघाली. मृत्यू भवन, पाताळ भवन व त्यानंतर तोच घोडा स्वर्ग भवनात उभा केला. देवीने सर्व हकिकत ब्रह्मदेवाला सांगितली. तेव्हा ब्रह्मदेवाने ताम्रपानावर लिहिलेला ग्रंथ जमिनीवर पडला. तेव्हा त्या ग्रंथाचे पान इतस्तत: विखुरली गेली. त्यावरून देवीला हिंगलाजपूर येथील खऱ्या सेवाधारी भक्ताचा शोध लागला, अशी आख्यायिका आहे